Majha Impact | मुंबईला नवीन रडार मिळणार; पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची माहिती
ऐन तोक्ते चक्रीवादळाच्या तोंडावर मुंबईच्या रडारमध्ये बिघाड झाल्याची बातमी एबीपी माझाने दिली होती. त्यानंतर आता मुंबईला नवीन रडार मिळणार आहे. एबीपी माझाला पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली आहे.
मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील भागात झालेल्या नुकसानानंतर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून मुंबईसाठी 5 नवे रडार देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून एबीपी माझाला देण्यात आली आहे. यासंदर्भात पुढील 3-4 महिन्यात एक सी बॅन्डरडार आणि 4 एक्स बॅन्ड रडार मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राला मिळणार आहे. त्याचसोबत अरबी समुद्राच्या किनारपट्टीसाठी दक्षिणेत मंगलोरमध्ये एक स्वतंत्र रडार तर अहमदाबादमध्ये देखील नवीन रडार उभारणार येणार आहे. रडारमुळे पावसाची तीव्रता आणि ढगांमध्ये पाणी आहे की बाष्प यासंदर्भातली अचूक माहिती मिळण्यास मदत मिळणार आहे.
अरबी समुद्रात मागील 3-4 वर्षात मोठी वादळं तयार होत आहेत. अशात अचूक आणि बरोबर माहिती मिळावी म्हणून या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. उत्तर भारतात देखील पावसाचा अचूक अंदाज मिळावा यासाठी गुरुग्राममध्ये देखील एक मोठे रडार बसवण्यातआले आहे. ते देखील काही चाचण्या झाल्यानंतर वापरात येणार असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवनराजीवन यांनी दिली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे डॉपलर रडार ऐन चक्रीवादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या वेशीवर असताना नादुरुस्त झाले. त्यामुळे रडार बंद झाल्याने चक्रीवादळामुळे होणारा पाऊस किती पडेल याबद्दलची अचूक माहिती मिळणार नव्हती. पालघर ते रत्नागिरीपर्यंतच्याअपडेटसाठी फक्त सॅटेलाईट्स इमेजेसवर अवलंबून राहावे लागणार होते. चक्रीवादळात येणाऱ्या कोणत्या ढगांमध्ये पाणी आहे आणि कोणत्या ढगांमध्ये बाष्प आहे तसेच पावसाचा अचूक अंदाज याची माहिती रडारच्या माध्यमाातून मिळत असते. अशात ऐन तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राजवळ घोंगावतअसताना आपल्याला तीन हाय रीझोल्यूशन उपग्रहांवर अवलंबून राहावे लागले. ज्यामुळे अचूक माहिती मिळण्यास अडचणींचा सामनाकरावा लागला.
एकीकडे चक्रीवादळ गुजरातकडे गेल्यानंतर देखील अद्यापही मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा रडार नादुरुस्तच आहे. रडारमधील एक पार्ट खराब झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम अभियंत्यांकडून सुरु असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी देखील हे रडार बंद होते.