Main Rajaram Kolhapur : मेन राजाराम स्थलांतर घाट; पालकमंत्री दीपक केसरकरांच्या राजीनाम्यासाठी एक लाख ई-मेल
Kolhapur : ऐतिहासिक ठेवण असलेल्या मेन राजारामच्या स्थलांतर घाट घातल्यानंतर कोल्हापूरकरांनी लढा आणखी तीव्र केला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी एक लाख ई-मेल पाठवण्यात येणार आहेत.
Main Rajaram Kolhapur : कोल्हापूरचे वैभव आणि ऐतिहासिक ठेवण असलेल्या मेन राजारामच्या स्थलांतर घाट घातल्यानंतर कोल्हापूरकरांनी लढा आणखी तीव्र केला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या राजीनाम्यासाठी एक लाख ई-मेल पाठवण्यात येणार आहेत.
केसरकर यांचा राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक लाख ई-मेल पाठवण्याचा ठराव माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे म्हणाले की, मेन राजाराम वाचवणे ही काळाची गरज आहे. पालकमंत्री केसरकर हे छुप्या मार्गाने शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असून कोल्हापूरकर त्यांचा हेतू सफल होऊ देणार नाहीत.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला. गरीबांची शाळा बंद होत असताना जिल्ह्यातील नेते मात्र शांत आहेत, त्यांना फक्त आपली मते हवी आहेत. मत मागण्यास येणाऱ्यांना, मेन राजारामसाठी काय केले, असा जाब विचारण्याचे आवाहन अनेक माजी विद्यार्थ्यांनी केले.
कोल्हापूरच्या वैभवात भरणारी वास्तू
मेन राजाराम ही फक्त वास्तू नसून तो कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. मेन राजारामची स्थापना 1870 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून मेन राजाराममध्ये अनेक रथी, महारथी शिकले आहेत. त्यांनी फक्त देशात नव्हे, तर जगाच्या पाठीवर आपल्या नेतृत्वाचा आणि संशोधनाचा ठसा उमटवला आहे. महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, जागतिक किर्तीचे संशोधक जयंत नारळीकर असे दिग्गज या शाळेत शिकून मोठे झाले आहेत. अशा महनीय व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इमारतीवर काहींनी डोळा ठेवत यात्री निवास सुरु करण्याचा घाट घातला आहे.
मेन राजाराममध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत?
सध्या मेन राजाराममध्ये 772 विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये सर्वाधिक 432 विद्यार्थीनी असून गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. मेन राजाराममध्ये शिकत असलेल्या सर्व मुली करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. ज्या मुलींची अडचण आहे, त्यांना शाळेकडून वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती परिसरात शाळा असल्याने अनेक मुलींना सुरक्षित वाटते.
इतर महत्वाच्या बातम्या