Aurangabad: अजान बंद होत नसल्याने मनसेकडून पोलीस ठाण्यासमोर 'सत्याग्रह आंदोलना'चा इशारा
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने, नवीन वादाला तोंड फुटले आहे.
MNS Protest: मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे काढून घेण्याची मागणी करत मनसेकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली. जर भोंगे काढले जात नसेल तर त्याच मशिदीसमोर असेलल्या मंदिर किंवा घरांवर भोंग्यातून हनुमान चालीसा वाजवण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. याचवेळी कायदेशीर आंदोलन सुद्धा करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता भोंग्यातून हमुमान चालीसा वाजवण्याच्या आंदोलनासोबतच गांधीरीगरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जेष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील पहाटेची अजान बंद होत नसल्याने पोलीस ठाण्यासमोरच सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा महाजन यांनी दिला आहे.
सातारा परिसरातातील मशीदीवर सकाळी 6 वाजेच्या आधी मोठ्या आवाजात अजान दिली जाते. त्यामुळे ही अजान बंद करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन महाजन यांनी काही दिवसांपूर्वी सातारा पोलीस ठाण्यात दिले होते. मात्र त्यांनतर कोणतेही कारवाई झाली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. याबाबत सातारा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना अनेकदा मॅसेज करूनही प्रतिसाद मिळत नाही. पोलीस आयुक्तांना अनेकदा फोन केले, मॅसेज केले मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भेटीची वेळ मागीतीली मात्र तेही देण्यात आली नसल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.
आंदोलनाची तारीख लवकरच...
यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, निवदेन देऊनही पोलिसांकडून कोणतेही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता सातारा पोलीस ठाण्याच्या समोरच मी सत्याग्रह आंदोलन करणार आहे. आज मुंबईला निघालो असून, तेथून आल्यावर लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचं महाजन म्हणाले.
पोलीस सुद्धा घाबरतात...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर मोठ्या आवाजात प्रार्थना करता येत नाही. असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र असे असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलीस सुद्धा घाबरतात असेही यावेळी महाजन म्हणाले.