Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
Maharashtra Vidhan Sabha Election : एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत महायुतीचे सुद्धा जागावाटप पूर्ण होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यातील विधानसभा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी गेल्या काही दिवसांपासून काथ्याकूट सुरु आहे. दोन्हीकडे एकमेकांच्या जागांवर दावा सुरू असतानाच कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबतही चर्वितचर्वण सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज (18 सप्टेंबर) महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भाने मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. तीन दिवस होणाऱ्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष किती जागा लढवणार याबाबत अंतिम फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे.
महिन्याच्या अखेरपर्यंत महायुतीचे सुद्धा जागावाटप पूर्ण होणार
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून जागावाटप निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच महायुतीने जागावाटपासाठी कंबर कसली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत महायुतीचे सुद्धा जागावाटप पूर्ण होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. 288 जागांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार वन टू वन पद्धतीने चर्चा करत आहेत. सध्या 288 जागांबाबत देवेंद्र फडणवीस-अजित पवार, अजित पवार-एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस चर्चा पूर्ण करत आहेत.
या चर्चा पार पडल्यानंतर तिन्ही पक्षांकडून जागांवरती दावा करण्यात येत आहे त्याबाबत हे तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. दरम्यान, त्यांनी तिन्ही पक्षांमधील काही जागांवर एकमत झालंच नाही, तर अंतिम निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून घेतला जाणार आहे. आणि तो निर्णय सर्व नेत्यांना मान्य असणार असल्याची माहिती सुद्धा एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक
दरम्यान, जागावाटपासाठी महाविकास आघाडीची आजपासून मुंबईत बैठक होणार आहे. प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जागावाटपाचा निर्णय उमेदवारांच्या विजयाच्या संभाव्यतेवर आधारित असेल. MVA युतीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि काँग्रेस यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचे मनोबल वाढले आहे. या कारणास्तव पक्ष अधिक जागांची मागणी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा जागांपैकी 110-120 जागांवर विधानसभा निवडणूक लढवायची आहे.
इतर महत्वाच्या बातम्या