Uddhav Thackeray : महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही एकत्र : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी फुटलेली नसून आम्ही अजूनही एकत्रच आहोत. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळत सांगेन असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई : महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही एकत्रच आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विधिमंडळात बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी फुटलेली नसून आम्ही अजूनही एकत्रच आहोत. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळत सांगेन असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. आता मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोनासारख्या संकटाचा मुकाबला केला आहे. कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आलं होतं. त्या संकटापुढं सध्याचं संकट काहीच नाही. या संकटाचा देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुकाबला करू. आपल्याला संघर्ष करायचा असून न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. कायद्यासमोर सगळे सारखे असतात त्यामुळे न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. परंतु, जनता उघड्या डोळ्यांनी सर्व पाहात असते. न्यायदेवता आणि जनता ही लोकशाहीची मोठे आधारस्तंभ आहेत. हे दोन्ही खांब जोपर्यंत मजबूत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाही राहील. आम्ही देशात बेबंदशाही येऊ देणार नाही, असा अप्रत्यक्ष निशाणा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर साधला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सर्व नेत्यांना संबोधित केले. "हे ही दिवस जातील, जगभरात संकट होतं तेव्हा आपल्याला सत्ता मिळाली आणि आता कोरोना गेल्यावर यांनी सत्ता हुस्कवली. पण आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. मी अधिवेशनात उपस्थित राहत नाही, कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेलीय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "मागच्या अडीच वर्षात अजित पवार यांनी आर्थिक गाडा ज्या पद्धतीने सांभाळला त्याचं कौतुक आहे. कोरोना काळात जीव वाचवणयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, आम्ही कामं केली नाहीत असं कोण म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना मला सांगायला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी दगा फटका करेल. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला. यांना आम्ही खूप सन्मान दिला पण यांनी आमचा घात केला. 15 आमदारांना देखील अनेक ऑफर आल्या पण ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. संजय राऊत बोलले की, मरण पत्करू पण शरण जाणार नाही. अनेक वर्षे राजकारण केले पण वैयक्तिक संबंध कधी बिगडू दिले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागणार आहे त्यावरून लोकशाही की बेबंदशाही हे जगासमोर स्पष्ट होणार आहे.