Sanjay Raut : राज्यपालांनी दिलेले आदेश असंवैधानिक, सुप्रीम कोर्टात दाद मागणार: संजय राऊत
Sanjay Raut : आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे हे बेकायदेशीर असून कोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Sanjay Raut : राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशनाचे हे सत्र असंवैधानिक असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई प्रलंबित होत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे आदेश देणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून आशा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी दोन वर्ष 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आता एकाच दिवसात सरकारला बहुमत चाचणीचे आदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत होण्याची प्रतिक्षा भाजपकडून केली जात होती. त्यामुळेच 12 आमदारांची फाईल रखडवली असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यपालांनी दिलेले आदेश हे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले.
16 आमदार निलंबन प्रकरणी.. दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी११जुलै पर्यंत मुदत देते आणि राज्याचया विधान सभेचे आधिवेशन १ दिवसात बोलावतात हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे.@PMOIndia@Dev_Fadnavis pic.twitter.com/cbitG5ksKR
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022
तर मी बोलणार नाही, राऊतांचा निर्वाळा
बंडखोर आमदारांनी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलू नये अशी मागणी केली आहे. त्यांच्या बोलण्यामुळे सरकार संकटात आल्याचा दावा त्यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, मी पक्षाची भूमिका मांडत असतो. पक्षानेच ही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे काहींना आक्षेप असल्यास मी माध्यमांशी बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले.