![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Maharashtra Winter Session: गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदाची निवड महत्वाची ठरणार आहे.
![विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे? Maharashtra Winter Session Legislative Council Chairmans Position Decision Today Neelam Gorhe or Ram Shinde विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/5f29ff1056f81095af78bdead529479817344124839421063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Winter Session: राज्यात विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.दरम्यान या अधिवेशनात विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषद सभापती पद रिक्त असल्याने या पदावर नेमकी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या संदर्भात स्पष्टता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाच्या चर्चेदरम्यान विधानपरिषदेचे सभापती पद शिवसेनेकडे असावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नीलम गोऱ्हे सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर कार्यरत आहेत. रामराजे निंबाळकर यांच्या विधानपरिषद सभापती पदाच्या कार्यकाळानंतर गोऱ्हे यांनी उपसभापती पदाची जबाबदारी सांभाळली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदाची निवड महत्वाची ठरणार आहे. कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला या पदावर संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आगामी राजकीय घडामोडींकडेही वेध लागणार आहे. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजप आग्रही आहे, कारण त्यांच्याकडे परिषदेमध्ये सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे. या पदावर सध्या राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे, शिवसेना देखील या पदासाठी इच्छुक आहे आणि त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळू शकते.
सभापतीपद कोणाकडे?
रामराजे नाईक निंबाळकर हे सभापतीपदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे. शिवसेनेतून (शिंदे गट) या पदासाठी दावा करण्यात येत होता. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. त्यांना संधी मिळाल्यास त्या विधानपरिषदेच्या पहिल्या महिला सभापती ठरू शकतात. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, भाजपकडून विधान परिषद सदस्य राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. भाजप विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे या पदावर भाजपकडूनही दावा केला जात आहे. राम शिंदे यांचा विधानसभेला रोहित पवार यांच्याकडून निसटत्या मतांनी पराभव झाला असला तरी, सभापतीपदासाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राष्ट्रवादीकडूनही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली याआधी सत्तेत सहभागी होण्यासाठी मंत्रीपदाबरोबरच विधानपरिषदेच्या सभापतीपदाबाबत बोलणी केली गेली होती.
पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत 35 हजार 788 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली. तर मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून 36 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागणी मांडली.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)