Weather today: उत्तरेत शीतलहरींचे अलर्ट; वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात थंडीचा कहर वाढणार, पावसाच्या इशाऱ्यानेही होणार परिणाम
उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचा अलर्ट जारी केल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. काही भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा इशाराही दिलाय.

Maharashtra Weather Update: डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटांचा इशारा देण्यात आलाय. उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात (Minimum Temperature) लक्षणीय घट झाली आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेल्याने नागरिकांना हुडहुडी भरलीय. केंद्रीय हवामान खात्याने उत्तर भारतात आज थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. (Weather Update)
हवामान विभागाचा इशारा काय?
भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात थंडीचा अलर्ट जारी केलाय. या भागात बहुतांश क्षेत्रामध्ये दाट धुक्याचा अलर्ट देण्यात आला असून पर्वतीय क्षेत्रांवर सक्रिय होत असणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तरेत काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा चंदीगडमध्ये दाट धुक्याची चादर कायम राहणार असून उत्तरेतील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे.
राज्यात पुढील 24 तासात गारठा वाढणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या शेवटी राज्यभरात नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. नववर्षातही थंड व कोरडे जमिनीलगत वारे उत्तरेकडून खाली येत असल्याने उत्तर महाराष्ट्र मुंबईसह लगतच्या काही भागांमध्ये तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
26/12: #नवीन_वर्षाचा🎅प्रारंभ थोड्या काळासाठी #गारठा! 🎉
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 26, 2025
३१ डिसेंबर व १ जानेवारी २०२६ दरम्यान #उत्तर_महाराष्ट्र व #मुंबईसह लगतच्या काही भागात #तापमानात_घट होण्याची शक्यता IMD मॉडेल मार्गदर्शनात दिसते.
थंड व कोरडे जमिनीलगत वारे(९२५ एचपीए) उत्तरेकडून खाली राज्यात येण्याची शक्यता. pic.twitter.com/5izLG5kHHu
पुढील 5 दिवस महाराष्ट्रात तापमान कसे?
महाराष्ट्रात सध्या थंडीच्या लाटेचा इशारा नसला तरी दिवसा गणित गारठा वाढताना दिसतोय. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. सध्या पहाटे आणि संध्याकाळी वाढणाऱ्या गारठ्याने नागरिकांना हुडहुडी भरली आहे. पुणे, नाशिक, जळगाव बहुतांश उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत आहे. मराठवाडा विदर्भातही तापमान घसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नाशिक, पुण्यात काल 9 अंशांची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी 10 ते 12 अंशांच्या दरम्यान तापमान होते. उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात पाहते आणि संध्याकाळनंतर तापमान घटताना दिसले. येत्या 7 दिवसात राज्यातील हवामान कोरडे राहणार असून नवीन वर्षात नागरिकांना गारठा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.























