Maharashtra Weather: अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, शेतकरी संकटात
राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. आधीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई अजून अनेकांना मिळालेली नाही. तसेच केंद्राचं पथक गेल्या पावसाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आता राज्यात आलं आहे. यातच आता हवामान बदलाचा पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
तळकोकणात आंबा, काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता तळकोकणात गुलाबी थंडीनेही पाठ फिरवली असून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. थंडी नंतर अचानक ढग दाटून आल्याने कोकणातील आंबा, काजू पिकावर यांचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यानी वर्तवली आहे. ढगाळ वातावरण, पाऊस असाच सुरू राहिल्यास आंबा पिकाला मारक ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण बदलत्या वातावरणाचा प्रभाव कायम राहिल्यास आंबा मोहोरावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच उशिरा आलेला मोहोर आणि त्यात बदलत्या वातावरणाचा फटका हा आबा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. सिंधुदुर्गातील देवगड हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. मात्र यावर्षी आंबा खवय्यांना हापूस उशिराने चव चाखायाला मिळणार आहे. त्यात बदलत्या वातावरणाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरण चार-पाच दिवस राहण्याची शक्यता कोकणात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे आणि हेच ढगाळ वातावरण अजून चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणून पुढचे चार ते पाच दिवस कोकणामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणे अपेक्षित असल्याची माहिती बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक पराग हळदणकर यांनी दिली. बदलत्या वातावरणाचा परिणाम आंब्याच्या मोहरावर भुरी किंवा तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तर अवकाळी पावसामुळे काजूवर इमॉस्कोटो आणि करपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावर कोकण कृषी विद्यापीठाने केलेल्या औषधांच्या फवारणीचा अवलंब करावा.
तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा जरी ज्वारीला फायदा होणार असला तरी गहू हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.