आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा, राज्यात हुडहुडी वाढली, पुढील तीन दिवस कसं असेल हवामान?
राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात थंडीचा लाट आली आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात थंडीचा लाट आली आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यतील जेऊरसह जळगावमध्ये थंडीची लाट तर निवडक शहरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी यांनी एबीपी माझाला दिली आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात कुठे कुठे थंडी पडणार याबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे.
अतितीव्र थंडीची लाट
उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे, थेट सोलापूर जिल्ह्यापर्यंत झेपावल्यामुळे, आज जेऊर (ता. करमाळा) येथे कालच्या पेक्षा किमान तापमान घट होवून अतितीव्र थंडीची लाट जाणवली. आज तेथील किमान तापमान 9 अंश से. पर्यंत घटले असुन ते सरासरीच्या 14 अंश से. ने खाली आहे. तेथील सकाळी नोंदली गेलेली सापेक्ष आर्द्रता ही आज 56 टक्के असुन ती तेथील अति कोरडे वातावरण दर्शवत आहे.
थंडीची लाट
जळगावला आज पुन्हा कालच्या पेक्षा तापमानात घसरण होवून 9.4 अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ते सरासरीच्या 6.4 अंश से. ने खाली आहे. त्यामुळे तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. जळगावचे आजचे दुपारी 3 चे कमाल तापमानही 29.8 अंश से. नोंदवले गेले असून ते सरासरीच्या 3.7 अंश से.ने खालावलेले आहे.
थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती
महाराष्ट्रातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड डहाणू मोहोळ नाशिक नंदुरबार नांदेड सांगली ह्या शहरांबरोबरच संपूर्ण विदर्भातील शहरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
पुढील तीन दिवस थंडीचे
आजपासून बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर पर्यंतच्या तीन दिवसात धुळे नंदुरबार जळगांव नाशिक अहिल्यानगर सोलापूर सांगली डहाणू व छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी तसेच संपूर्ण विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरून रात्री चांगल्याच थंडीची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी एबीपी माझाला दिली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल
दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल जाणवू लागला आहे. हळूहळू थंडी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी थंडीची लाटसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यामुळं को शेकोट्या पेटवताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























