4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा
Talathi Recruitment 2023 : 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत.
Maharashtra Talathi Recruitment 2023 : सरकारने काढलेल्या तलाठी भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमवायला निघाले आहेत. कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा शुल्कापोटीच शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही तलाठी व्हायला निघालेत.
4 वर्षानंतर राज्यात तलाठी गट(क) भरतीला मुहूर्त लागलाय. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली. २६ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. आज ज्यात २३ जुलै पर्यंत राज्यातील तब्बल 13 लाखांच्या जवळ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अजून दोन दिवस म्हणजेच २५ जुलै पर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केला तर एका जागेसाठी 275 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झालीय, याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा २० पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण शुल्क रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. एवढंच नाही तर हा आकडा येत्या दोन दिवसात अजून वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे एवढं शुल्क रक्कम मिळूनही परीक्षा पारदर्शक होत नाहीत, हा मागच्या काही परीक्षांचा अनुभव आहे. उस्मानाबाद मधील बाबासाहेब गाढवे यांनी आपल्यासह पत्नीचाही तलाठी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. दोघांचा एकदम अर्ज केल्याने कुटुंबाचे उदारनिर्वाहासाठी ठेवलेले दोन ते अडीच हजार रुपये खर्चाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे. उस्मानाबादच्या सह्याद्री रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा रामेश्वर बाबासाहेब कांबळे हे ग्रॅज्युएट आहेत, आपल्या आई-वडिलांचे छत्र हरवल्याने स्वतः काम करून उदरनिर्वाह चालवतात. त्यात त्यानं तलाठी पदासाठी फॉर्म भरला आहे, ज्याने त्याला मिळणाऱ्या पगारातील दीड हजाराची पदरमोड करावी लागली आहे..
राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्याची घोषणा झाली, मात्र ही घोषणा हवेतच जिरली. त्यानंतर होणारी ही पहिलीच भरती होय. त्यामुळे ही भरती वय वाढत चाललेल्या अनेक तरुणांना आशेचा किरण निर्माण करणारी आहे. त्यामुळेच तलाठी पदासाठी अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही अर्ज केले आहेत. बीएस्सी ऍग्री, एमएसस्सी बायोटेक आणि आता LLB ला तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या बालाजी शिंदे या तरुणानेही अर्ज केलाय. कितीही उच्च शिक्षण घेऊन संधीच दिसत नसल्याने हा पर्याय निवडल्याचे बालाजी सांगतो. बालाजीसारखीच अवस्था बी.कॉम,एम कॉम केलेल्या श्रीपाद दलालची झालीय. लग्नाचा विषय असो तसेच वय वाढत असल्याने आयुष्यात काही ना काही तरी व्हावे म्हणून हा खटाटोप करत असल्याचे सांगून हे उच्चशिक्षित तरुण नोकर भरतीच्या अनुषंगे सरकारी धोरणावर संताप व्यक्त करताहेत.. एकूणच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार वर्षांनुवर्षे शासकीय भरती काढत नाहीत. अन् काढली की बेरोजगार तरुण ती मिळवण्यासाठी तुटून पडतोय.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI