एक्स्प्लोर
राज्याच्या तिजोरीतील खडखडाटावर 'लॉटरी'चा इलाज?
पूर्वेकडच्या राज्यांच्या तेजी लॉटरीला तोंड देण्यासाठी काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेसुद्धा आठवडी, रोज, मासिक सोडतीची संख्या विक्रमी वाढवली आहे. त्यामुळे राज्याची ढासळती आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासनाने आपल्या नोटरीप्रेमी नागरिकांसाठी सात दिवसात तब्बल 32 लॉटरीच्या सोडती काढण्याचे ठरवले आहे. पूर्वेकडच्या राज्यांच्या तेजी लॉटरीला तोंड देण्यासाठी काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारनेसुद्धा आठवडी, रोज, मासिक सोडतीची संख्या विक्रमी वाढवली आहे. त्यामुळे राज्याची ढासळती आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 12 एप्रिल 1969 रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना राज्यात झाली. मटका आणि जुगारासारख्या व्यसनांना प्रतिबंध घालून, त्यातून सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने या लॉटरीची सुरुवात केली होती. सरकार लॉटरीच्या सोडती वाढवून राज्याच्या तिजोरीतील खडखडाटावर लॉटरीचा इलाज करत असल्याचे बोलले जात आहे. हा पर्याय सरकारसाठी कसा राहील? याविषयी वेगवेगळी मतमतांतरे आहेत. सध्या सरकारकडून लॉटरीच्या सोडतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 15 जुलै 2019 ते 21 जुलै 2019 या काळातील अधिकृत लॉटरीची संख्या 32 एवढी झाली आहे. या लॉटरीच्या सोडतीमध्ये सध्या एकही दिवस शिल्लक राहिलेला नाही. ही लॉटरी सोडत साप्ताहिक तसेच मासिक आणि वार्षिक असते. शासनाच्या 32 लॉटरी सोडतीतून सरकारी तिजोरीत मोठा महसूल येईल, असा अंदाज आहे. मासिक सोडतीची वैशिष्ट्ये 1. महाराष्ट्र सह्याद्री नावाची सोडत ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल. 50 रुपये किंमतीची पाच मालिकेतील तीन लाख तिकिटे सरकार छापणार. यातील प्रत्येक मालिकेत साठ हजार तिकिटे असून यात पाच डिजिटचा क्रमांक लागला तर विजेत्याला पंचवीस लाख रुपये मिळतील. 2. या सोडतीतल्या दीड कोटी रुपयांच्या या लॉटरी तिकीटातून पहिले बक्षीस 25 लाखांचे असणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकासाठी 5 लाखांचे, तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाखांचे बक्षीस असेल, 3. एकूण 30 हजार विजेत्यांना 100 रुपयांचे बक्षीस, 30 विजेत्यांना 200 रुपयांचे बक्षीस मिळेल. तसेच 500 ते 1000 रुपये जिंकण्याचीदेखील संधी असेल. 4. या लॉटरी सोडतीत दररोज 30 हजार 993 विजेते होतील. यामाध्यमातून 71 लाख 20 हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच सर्वाधिक तिकीटांची खरेदी करणाऱ्या विक्रेत्याला 20 ते 32 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. असे होणार सोडतीचे निकाल जाहीर सोडतीचे निकाल जाहीर करण्यासाठी पंचमंडळासमोर प्रत्येक चकती रबरी पिशवीत ठेवली जाईल. त्यामुळे चकतीवरचे अंक दिसणार नाहीत. पंचमंडळाच्या अध्यक्षांनी घंटी वाजवल्यावर सर्व चकती एकाच वेळी फिरवल्या जाऊन सोडतीची सुरुवात होईल. अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवल्यावर सर्व ड्रम्स एकाच वेळी फिरायचे थांबतील. नंतर चकतीवरील अंक दाखवले जातील. अध्यक्ष अंक घोषित करतील. अंक ज्या क्रमाने निघतील त्या क्रमाने फलकावर प्रदर्शित केले जातील. राज्याची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत देशात सर्वाधिक कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत 'क्रिसिल' या पतमानांकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात राज्याची स्थिती चांगली असल्याचे सांगितले होते. सकल उत्पन्नाच्या तुलनेत (जीएसडीपी) कर्जाचे प्रमाण हे 17.5 टक्क्यांच्या जवळ असून देशात एवढे कमी प्रमाण इतर कोणत्याही राज्याचे नाही, असे मत नोंदवण्यात आले होते. परंतु एका अंदाजानुसार महाराष्ट्रावरी कर्जाचा बोजा या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत पाच लाख कोटींच्या आसपास होईल, असे सांगण्यात येत आहे. लॉटरी ला GST चा फटका उस्मानाबाद येथील लक्ष्मण मोरे हे 25 वर्षांपासून लॉटरी तिकीट विक्री करतात. दरम्यान GST च्या माध्यमातून बक्षीसांचे आकडे घटल्याने आपल्या तिकीट विक्री व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी साप्ताहिक लॉटरीचे प्रथम बक्षीस 12 लाख रुपये इतके होते, ते आता 7 लाखांवर आले आहे. तसेच मासिक सोडत असलेल्या लॉटरीचे प्रथम बक्षीस 35 लाखांवरुन 25 लाख इतके कमी झाले आहे. दरम्यान, महत्वाच्या सणाच्या निमित्ताने वार्षिक सोडत असलेल्या लॉटरी तिकिटांचे बक्षीस देखील 2 कोटी रुपयाxवरून 1 कोटींवर आले आहे. यामुळे लॉटरीच्या तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे व्यवसायात 50 टक्के घट झाली आहे. सरकारकडून अनेकवेळा शिल्लक राहिलेल्या तिकिटातून विजेता घोषित केला जातो. हे टाळून केवळ विक्री झालेल्या तिकीटांमधून सोडत निघावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिल्लक तिकीटातून आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा सोडत निघते, त्यामुळे त्याचा अंशी परिणाम व्यवसायावर होत असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. महसूल उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देशाची पार्श्वभूमी पाहता 2016 -17 या आर्थिक वर्षात लॉटरी सोडतीत 7 कोटी 33 लाख रुपये मिळाले होते. तसेच लॉटरी करापोटी सरकारला 137 कोटी 79 लाख रुपयांची रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा झाली होती. हाच पुर्वानुभव पाहता लॉटरी सोडत वाढवण्याचा प्रयोग होत आहे.
आणखी वाचा























