Unseasonal Rains: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन देणार
Unseasonal Rains: महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे अधिकारी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी देण्यात येणार आहे.
Unseasonal Rains: राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) आणि गारपिटीने (Hailstorm) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडीशी आलेले पिक गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे राजपत्रित अधिकाऱ्यांनी एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (Chief Minister Relief Fund) देण्याचे जाहीर केले आहे. एप्रिल महिन्यातील एक दिवसाचा पगार हा मुख्यमंत्री निधीत जमा केला जाणार असल्याची माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे (Maharashtra State Gazetted Officers Federation ) अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील विविध खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 70 खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध खात्यांमध्ये जवळपास दीड लाख राजपत्रित अधिकारी आहे.
अलिकडे राज्यात दोन वेळा झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना महासंघाशी संलग्न असलेले सर्व अधिकारीदेखील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करत असल्याचे राजपत्रित अधिकारी महासंघाने म्हटले. सध्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी राजपत्रित अधिकारी महासंघ पाठीशी असून एप्रिल 2023 मधील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी म्हटले.
अवकाळी पावसाचा राज्यातील शेती पिकांना मोठा फटका
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकं बाधित झाली आहेत. द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या बागांना मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडं गहू, ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला या पिकांचेही नुकसान झालं आहे.
शेतकरी चिंतेत
सध्या राज्यातील नागरिकांना सकाळी उन्हाळा आणि संध्याकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. त्यामुळं आधीच संकटात सापडलेला बळीराजा पावसासह तापमान वाढीच्या इशाऱ्यामुळं चिंताग्रस्त झाला आहे.