Nashik SSC Exam : नाशिक जिल्ह्यात दहावीचा पहिला पेपर 'कॉपीमुक्त', धुळ्यात मात्र एक कॉपी केस
Nashik SSC Exam : नाशिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून पहिल्या पेपरला एकही कॉपी केस आढळली नाही.
Nashik SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या (SSC Exam) परीक्षेला गुरुवारी (2 मार्च) सुरुवात झाली. कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या या परीक्षेतील प्रथम भाषा मराठी, हिंदी, ऊर्दू, गुजराती भाषेचा पेपरमध्ये एकही गैरप्रकार आढळून आला नाही. त्यामुळे कॉपीमुक्त मराठी भाषेच्या पेपरने दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाल्याचे नाशिक (Nashik) विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.
नाशिक विभागात (Nashik Division) दहावीची एकूण 456 केंद्रे असून एक लाख 97 हजार 206 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले असून कोरोनाकाळानंतर प्रथमच केंद्र स्तरावर दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. दहावीच्या पहिल्या पेपरसाठी नाशिक जिल्ह्यातील परीक्षार्थी 77 हजार विद्यार्थी हजर होते. मराठी विषयाच्या परीक्षेसाठी 69 हजार वीस विद्यार्थी प्रविष्ट होते तर 1607 विद्यार्थी गैरहजर होते तर उर्दू भाषेच्या पेपरसाठी 7584 विद्यार्थी हजर होते तर 89 विद्यार्थी गैरहजर होते तर हिंदी भाषेच्या पेपरसाठी 387 विद्यार्थी हजर होते तर एक विद्यार्थी गैरहजर होता तर गुजराती भाषेसाठी 45 विद्यार्थी हजर होते.
या परीक्षेला नाशिक जिल्ह्यातून 203 केंद्रावर एकूण 77 हजार 36 विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा मराठी, हिंदी, ऊर्दू आणि गुजराती भाषेतील परीक्षा दिली. दरम्यान, परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी लगबग करणाऱ्या विद्यार्थी व पालकांची सकाळी आठ वाजल्यापासूनच विविध परीक्षा केंद्रांच्या रस्त्यावर वर्दळ दिसून आली. तर नऊ वाजल्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावरही विद्यार्थ्यांनाना परीक्षेला सोडण्यासाठी आलेल्या पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. परीक्षा संपल्यानंतरही पालकांनी विद्यार्थ्यांना जवळ घेऊन मोठ्या उत्सुकतेने विचारपूस केली.
धुळ्यात गैरप्रकाराचे गालबोट
नाशिक विभागात कॉपी मुक्त परीक्षा अभियानाला दहावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विभागात नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात गैरप्रकाराचा एकही प्रकार उघडकीस आलेला नाही. परंतु धुळे जिल्ह्यात मात्र कॉपी मुक्त अभियानाला गैरप्रकाराचे गालबोट लागले. येथील एका विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान मराठीचा पेपर देताना कॉपी करताना पकडण्यात आले.
शिक्षक महासंघाचा बहिष्कार मागे
अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघमार्फत बारावीचा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. अखेर हा बहिष्कार मागे घेण्यात आला असून पेपर तपासणी सुरळीत होणार आहे.