SSC Exam : उद्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांची 'लढाई'; राज्यभरातील 533 केंद्रावर 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
SSC Exam : उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार असून त्यासाठी माध्यमिक शिक्षण बोर्डाने सर्व तयारी केल्याची माहिती आहे.
SSC Exam News : राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा असून उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. राज्यातून एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून ही परीक्षा 533 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. आज माध्यमिक बोर्डाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली असून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली.
राज्यातील दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे 2 मार्च सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये 8,44,16 मुले असून 7,30,62 मुली या परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा 61 हजार 708 इतके कमी विद्यार्थी बसलेत. राज्यातील 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे असं बोर्डाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दहावीच्या परीक्षेसाठी सूचना
विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचं आहे. हॉल तिकीटवर देखील टाईमटेबल नमूद केलेलं आहे.
जुने पेपर सोशल मीडियावर व्हायरल होतात त्याकडे लक्ष देऊ नये
सहाय्यक परीक्षकाने GPS सुरू ठेवणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला 10 मिनीटे आणि शेवटी 10 मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे.
यंदा एकूण 8190 दिव्यांग विद्यार्थी ही परीक्षा देत असून 73 तृतीयपंथी विद्यार्थीही दहावीची परीक्षा देत आहेत.
दहावीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे. या अभियानात राज्याचे नोडल अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त यांना आणि प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी, अशा सूचाना देण्यात आल्या आहेत.
गेल्या पाच वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या
मार्च 2019 16 लाख 99 हजार 465
मार्च 2020 17 लाख 65 हजार 829
मार्च 2021 16 लाख 58 हजार 614
मार्च 2022 16 लाख 38 हजार 964
मार्च 2023 15 लाख 77 हजार 256
लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा
मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यामुळे कॉपी बहाद्दरावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश घेण्यात काढण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI