(Source: ECI/ABP News/ABP Majha)
kudal malvan constituency : कुडाळ-मालवणमध्ये पुन्हा नाईक विरुद्ध राणे असाच 'सामना'? पाहा काय आहेत राजकीय समीकरणं
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ (kudal malvan constituency) हा एक चर्चेतील मतदारसंघ आहे. नारायण राणेंचा पराभव करत याच मतदारसंघातून वैभव नाईक शिवसेनेचे आमदार म्हणून पुढे आले आहेत.
kudal malvan constituency : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ (kudal malvan constituency) हा एक चर्चेतील मतदारसंघ आहे. कोकणचे नेते म्हणून ओळख असलेल्या नारायण राणेंचा (Narayan Rane) पराभव करत याच मतदारसंघातून वैभव नाईक (Vaibhav Naik) शिवसेनेचे आमदार म्हणून पुढे आले. परिणामी, हा मतदारसंघ चर्चेत राहिला. नारायण राणे यांना आव्हानाची भाषा देखील वैभव नाईक यांनी केलेली आहे. सध्या या मतदारसंघातून नारायण राणे यांचे जेष्ठ पुत्र, माजी खासदार निलेश राणे विधानसभेसाठी तयारी करत आहे. काही जाहिर कार्यक्रमांमध्ये त्यांनी तसं बोलून देखील दाखवलं आहे. शिवाय, निलेश राणे आगामी विधानसा निवडणुकीच्या दृष्टीनं बांधणी करताना, त्या भागात वावरताना देखील दिसून येत आहे.
वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले नाहीत. त्यामुळं आता निलेश राणे आगामी विधानसभेच्या दृष्टीनं तयारी करत असताना शिवसेनेसाठी या ठिकाणची लढाई कशी असणार ? बाजी मारण्यासाठी काय काय प्रयत्न केले जात आहेत. या मतदारसंघातील सद्याची राजकीय वस्तुस्थिती काय आहे? आगामी काळात कोणत्या गोष्टींचा प्रभाव या ठिकाणी पडू शकतो? या दृष्टीनं काही जाणकारांशी, वरिष्ठ पत्रकारांशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की, या विधानसभा मतदारसंघात लढाई चुरशीची असणार आहे.
वैभव नाईकांविरोधात नारायण राणे ताकद लावणार
याबाबत आम्ही सकाळचे सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्ती प्रमुख शिवप्रसाद देसाई यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वैभव नाईक यांच्या मतदारसंघात राणेंचा प्रभाव नक्कीच आहे. सध्या त्या ठिकाणी असलेले शिवसेनेचे नेते कुठे गेलेले नाहीत. ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता शिवसेनेसोबत कायम आहेत. पण, याचा अर्थ वैभव नाईक 100 टक्के निवडून येणार असा होत नाही. नारायण राणे सध्या सत्तेत आहेत. निलेश राणे या ठिकाणी उभे राहण्याकरता तयारी करत आहेत. त्यामुळं केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे या ठिकाणी आपली ताकद लावणार आहेत. परिणामी लढत चुरशीची असणार आहे' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी दिली आहे.
निलेश राणेंना भाजप उमेदवारी देणार का?
यानंतर आम्ही कणकवली येथे वरिष्ठ पत्रकार गणेश जेठे यांच्याशी देखील संवाद साधला. कुडाळ-मालवण या मतदारसंघाबाबत बोलताना जेठे यांनी आमदार म्हणून वैभव नाईक यांचा संपर्क दांडगा आहे. शिवसेनेत फुट पडून शिंदे गटात सावंतवाडीचे शिवसेना आमदार दिपक केसरकर गेले. त्याचा परिणाम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला नाही. कारण, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अद्याप तरी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी राखण्यास यश मिळवले आहे. त्यामुळं आताच्या घडीला मोठा फटका शिवसेनेला बसला आहे असं म्हणता येणार नाही. या मतदारसंघात शिंदे आणि भाजप यांची समीकरणं कशी असणार? शिंदे गटाकडून उमेदवार कोण असणार? हे पाहावं लागेल. सध्या निलेश राणे या ठिकाणी चाचपणी करत तयारी करत आहेत. पण, कणकवलीतून नितेश राणे यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे किंवा नितेश राणे त्याठिकाणाहून भाजपचे आमदार आहेत. त्यामुळं निलेश राणे यांना उमेदवारी भाजप देईल का? हे देखील पाहावं लागेल.
सध्या निलेश राणे देखील चांगले सक्रीय असून कामं करण्याकडे देखील लक्ष देत आहेत. राजकारणात गणितं बदलत असतात. सध्या स्थिती काय आहे? यापेक्षा आगामी काळात काय बदल होतील? एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचं या ठिकाणी समीकरण कसं असेल? हे पाहावं लागेल' अशी प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना पत्रकार गणेश जेठे यांनी दिली आहे.
लढत लक्षवेधी ठरणार
तळकोकणातील कुडाळ-मालवण या विधानसभा मतदारसंघातील गणितं आणि त्या ठिकाणची राजकीय गणितं पाहता निवडणुकीसाठी चुरस असणार आहे असं नक्कीच म्हणता येईल. यावेळी मतदारांचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. राज्याभरात लढती होत असताना कोकणातील लढती या नक्कीच लक्षवेधी असणार आहेत. कारण, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची कामगिरी, कोकणी माणसाची साथ कुणाला? याची उत्तरं देखील यावेळी मिळणार आहेत. शिवाय, सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी नारायण राणे यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
- Dapoli Khed Mandangad : बंडाळीनंतर दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय? 'कदमां'ना फायदा की नुकसान?
- chiplun sangmeshwar constituency : पुन्हा घड्याळ की सेनेचा धनुष्य? पाहा चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील राजकीय समीकरणं
- Video: 'दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा, तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात, आमचे नाही': निलेश राणे