Sharad Pawar: शरद पवारंकडून प्रफुल्ल पटेलांबाबत नाराजी, महत्त्वाची पदं देऊनही अजित पवारांसोबत गेल्यानं पदाधिकाऱ्यांसमोर दर्शवली नाराजी
संसदेच्या विशेष अधिवेशनात शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली होती. त्याचा फोटो पटेल यांनी ट्वीट केला होता. त्यावर शरद पवारांनी पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी पक्षात (NCP) झालेल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट झाले आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली होती. त्याचा फोटो पटेल यांनी ट्वीट केला होता.त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितपवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत नाराजी दर्शवली आहे. शनिवारी शरद पवार यांनी अहमदाबाद येथे गौतम अदानी यांच्या एका कंपनीच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली. त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना नाराजी व्यक्त केल्याची एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
शरद पवार म्हणाले, पक्षात महत्त्वाचं पद, प्रतिष्ठा, केंद्रात महत्त्वाचं मंत्रिपद देऊन देखील अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसमोर नाराजी दर्शवली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी शरद पवार म्हणाले, 'काळजी करू नका, जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दरवाजे बंद झालेत.' तसेच गुजरामधील पदाधिकाऱ्यांना मुंबईला सिल्वर ओकवर येण्याचे निमंत्रण शरद पवार यांनी दिले आहे.
संसदेच्या नव्या इमारतीमध्ये पहिल्या दिवसाचं कामकाज चाललं. त्यानिमित्ताने देशभरातील खासदार एकत्रित आले होते. याचवेळी अवघ्या काहीच महिन्यांपूर्वी वेगळे झालेल्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला. एवढंच नाही तर जेवणाच्या टेबलवर काही खासदार एकत्रित बसले. त्यामध्येही प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांच्या शेजारीच बसलेले दिसतात. वरवर दिसतेय ती राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट. पण ही फुट खरोखरच आहे का? की राजकीय सोईसाठी केलेली ही मिलीभगत आहे? राज्यातल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला असतानाच आता प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले.
शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचे सहकारी भाजपसोबत सत्तेत सामील झाले. पक्षाचा आणि त्याच्या चिन्हाचा वाद जरी निवडणूक आयोगात गेला असला तरीही दोन्ही गटांचे नेते एकमेकांवर जाहीर टीका करण्याचे टाळताना दिसतात. त्यामुळे नेत्यांची राजकीय भूमिका एक आणि दिसणारं चित्र वेगळंच असा काहीसा प्रकार राष्ट्रवादीसोबत घडतोय. शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोणती राजकीय समीकरणं जुळवतील आणि कोणता राजकीय डाव टाकतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही हेच खरं.
हे ही वाचा :