(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे उद्घाटन आज, शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास होणार सुलभ, मंत्री दादा भुसे करणार लोकार्पण
Samruddhi Mahamarg : या महामार्गामुळे ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ तसेच जलद होणार आहे. यामुळे प्रवाशांना 1 तासात शिर्डीला देखील पोहचता येणार आहे.
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राचे भूषण असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून, आज सकाळी 11 वाजता इगतपुरी पथकर प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
16 गावातून जाणार महामार्ग
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 कि.मी लांबीचा मार्ग हा एकूण 16 गावातून जात आहे. या तिसऱ्या टप्प्याचा खर्च सुमारे 1078 कोटी असून या लोकार्पणामुळे 701 किमी पैकी आता एकूण 625 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ तसेच जलद होणार आहे. यामुळे प्रवाशांना 1 तासात शिर्डीला देखील पोहचता येणार आहे. याशिवाय शिर्डी, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात ये-जा करण्यासाठी कमी कालावधी लागेल.
वाहनांना विनाअथडळा मुंबईपर्यंत पोहोचता येणार
समृद्धी महामार्गाच्या भरवीर-इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज होणार असून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होत आहे. त्यामुळे भिवंडीपासून इगतपुरीपर्यंत नाशिक मार्गावर होणारी वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. तसेच घोटी-सिन्नर मार्गावर वाहनधारकांचा प्रवासातील तब्बल दीड तास वाचणार आहे. त्यामुळे इगतपुरीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. समृद्धी महामार्गाने नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे .नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता. तर या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला आहे. भरविर ते इगतपुरी हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विनाअथडळा द्रुतगती महामार्गाने मुंबईपर्यंत पोहोचता येणार आहे.
इगतपुरी ते आमने - शेवटच्या टप्पा जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत
तिसऱ्या टप्प्यातील उद्घाटनानंतप एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याचीही कामे वेगाने सुरू आहेत. सद्य:स्थितीत या मार्गाची 90 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हा मार्गही जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यातून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गावरून करणे वाहनांना शक्य होणार आहे. तर उर्वरित महामार्गाची कामे जुलैपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
हेही वाचा>>>