Ration Supply : राज्यभरात पुढील दोन दिवस रेशन पुरवठा ठप्प, ई-पॉस मशीनमुळे धान्य वितरण रेंगाळलं
Ration e-POS Machines : नव्या ई- पॉस मशिनमुळे राज्यभर धान्य वितरणाची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याचं चित्र आहे. सर्व माहिती अपडेट करण्यासाठी आणखी दोन दिवस जातील अशी माहिती आहे.
मुंबई : राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प झाला असून त्यामुळे 7 कोटी लोकांसमोर मोठी अडचण निर्माण झाल्याचं दिसतंय. लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्याने धान्य वाटप होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रेशनिंग दुकानावर धान्य वाटप होणार नाही.
राज्यभरातील रेशनिंग लाभार्थ्यांची माहिती सेव्ह केली जाते त्या क्लाऊडची मुदत संपल्यानं सर्व डेटा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आणखी दोन दिवसांनी रेशनिंग वाटप सुरळीत होईल अशी माहिती आहे. राज्यात अंदाजे 7 कोटी लाभार्थी असून या महिन्यातील आतापर्यंत 5 टक्के रेशन वाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, या ई पॉस मशिनच्या समस्येमुळे रेशन धान्याचा काळा बाजार वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
ई-पॉस मशिनची प्रक्रिया धीमी
राज्यात सध्या रेशनवर मिळणाऱ्या धान्य वितरण व्यवस्था प्रणालीचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. ई-पॉस मशीनवर मिळणारे राशन आणि तिची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. एखादा लाभार्थ्याला जर रेशन मिळवण्याची वेळ आली तर त्या रेशन कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणता पंधरा-वीस मिनिटं ते अर्ध्या तासापेक्षाही जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे धान्य वितरण करणं आता वितरकांना मोठं कठीण होऊन बसलंय.
जुन्या पद्धतीचे ई पॉस मशीन बंद करून नवीन तंत्रज्ञान असलेली ई पॉस मशीन वितरकांना देण्यात आले आहेत. मात्र जुन्या मशीन पेक्षाही नवीन मशीन त्रासदायक ठरत असल्याने ग्राहकासह वितरकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
वाशिममध्ये ग्राहक वैतागले
वाशिम जिल्ह्यात 5 डिसेंबर पासून धान्य वितरण सुरू झालं आहे. ई पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण सुरू आहे. मात्र अत्यंत धीम्या गतीने एका ग्राहकांना 15 ते 20 मिनिटं ते अर्ध्या तासां पेक्षा अधिक वेळ लागतोय. रेशन कार्डवर धान्य उचल करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे ग्राहकासह वितरकही सतत सर्व डाऊनच्या त्रासाला कंटाळले आहे. अशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये आहे.
ही बातमी वाचा: