(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : राज्यात 'ऊन-सावलीचा खेळ', काही भागांत पावसाची रिमझिम, पूर ओसरतोय
Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळाल्यावर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे.
Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळाल्यावर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली. राज्यात काही भागांमध्ये तुरळक पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पुराचं साचलेलं पाणी ओसरू लागलं आहे. मुंबई आणि नवी मुंबईमध्येही पावसाची रिपरिप सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. धुळे, हिंगोली जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. भंडारा आणि गोंदियामध्येही मंगळवारपासून पाऊसाने दडी मारली आहे.
गडचिरोली जिल्ह्याला पुराचा फटका
गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबांचदेखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा ठप्प झाला. विद्युत् पुरवठा करणाऱ्या तारांवर मोठ्या प्रमाणात कचरा अडकून पडला होता आणि त्यातच पुराचं पाणी ओसरत असल तरी काही भागात अजून ही पाणी असल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून जीवघेणा प्रवास करत लाकडी बोटीच्या साह्याने विद्युत् तारेवर टाकलेल्या कचरा साफ करून वीजपुरवठा सुरळीत सुरू केलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात तुरळक पाऊस
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाने तुरळक हजेरी लावली. मात्र अकोला, अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसाने आणि जलाशयातील विसर्गामुळे जिल्ह्यातील पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील नांदुरा - जळगाव जामोद दरम्यान असलेल्या येरळी पूल अजूनही 10 फूट पाण्याखाली गेला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. जळगाव जामोद तालुक्याचा अजूनही थेट संपर्क तुटला आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर तालुक्यातील शेती पाण्याखाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील वाण नदीला आलेल्या पुरामुळे कोलाद, वडगाव वाण या दोन गावांचा संपर्क अजूनही तुटला आहे.
वर्धा नदी आणि उपनद्यांना पूर
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी, रहेमतनगर सारख्या इरई नदीकाठच्या भागात पुन्हा शिरले पुराचे पाणी शिरलं आहे. पाऊस नसतानाही वर्धा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. वर्धा-यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने वर्धा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. वरोरा तालुक्यातील सोईट ते गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा या गावापर्यंत पुराची स्थिती आहे. तेलंगणाला जोडणारा राजुरा-बल्लारपूर पूल मंगळवारी बंद झाल्यानंतर वर्धा नदीच्या पुरामुळे आज भोयेगाव-गडचांदूर मार्ग देखील ठप्प आहे.
विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पाऊस
गेले दोन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेलं पावसाचं थैमान आजही कायम आहे. विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसलाय. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर इतर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे अमरावतीच्या 30 तर तर वर्ध्याच्या 42 गावांचा संपर्क तुटला. मदत आणि बचावकार्यासाठी वर्ध्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्यात.