Rain Update: आधी पाण्याअभावी पिकं वाळली, आता तुफान पावसानं उरलीसुरली पिकं वाहून गेली; लातूरमध्ये मुसळधार
औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी सातनंतर औसा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. साडेसात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पावसाने तालुक्यातील अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढलं.
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. लातूरमध्ये (Latur Rain Updates) गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. शनिवारी मध्यरात्री लातूर शहर आणि परिसरात पावसानं तुफान बॅटिंग केल्यानंतर काल रविवारी औसा तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी सातनंतर औसा तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. साडेसात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पावसाने तालुक्यातील अनेक गावांना अक्षरशः झोडपून काढलं.
तपसेचिंचोली, लाडवाडी, लामजना, गाडवेवाडी, तांबरवाडी, बेलकुंड येथे वीजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. कमी कालावधीमध्ये झालेल्या या तुफान पावसामुळे उरलीसुरली पिके धोक्यात आली आहेत. या पावसानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 20 ते 25 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळं पिके वाळून जात होती. पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होता. आता पाऊस आला, मात्र तो इतका तुफान आला की पिके वाहून जाताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
25 दिवसांच्या खंडानंतर लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वेळ दिलासाही मिळाला. ऑगस्ट महिन्यातील 25 दिवस पाऊसच नव्हता. तर अति पावसाने जुलै महिन्यात पिके पिवळी पडली होती, मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे पिकांनी माना टाकल्या होत्या. अशा विचित्र स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्याला मध्यरात्रीच्या पावसाने दिला दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा ढगफुटीसारख्या पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. खरीपातील मुख्य पीकच सोयाबीन समजले जाते. जिल्ह्यात संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने एक दिवसही खंड न घेता दररोज हजेरी लावली होती. त्यात जिल्हाभरातील मोठे शेती क्षेत्र हे हलक्या प्रतीच्या जमिनीचे आहे. याच कारणामुळे जास्त झालेलं पाणी किंवा पावसाने उघडी दिल्यानंतर या जमिनीवरच्या पिकांचे नुकसान होते. यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून सोयाबीनवर संकटाची मालीकाच सुरु आहे. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पेरणी झाल्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे काही भागातील सोयाबीन वाहून गेले होते. काही दिवसानंतर दमट वातावरणात गोगलगाईचे संकट येऊन सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
महागड्या औषधांची फवारणी...
जुलै महिन्यात झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे पाणी साचून खरीपाची पिके पूर्णतः वाया गेली आहेत. ढगाळ वातावरणात सूर्यप्रकाश न मिळाल्याने उंचवट्यावरील आणि निचरा होणाऱ्या जमीनीतील पिकांचीही वाढ खुंटली. त्यानंतर येलो मोझॅकचे नवे संकट आल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच नुकसान झाले. अशावेळी पाऊस उघडण्याची शेतकरी वाट पाहत होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पाऊस उघडला, तेंव्हा आठ दिवस बरे वाटले. या काळात शेतकऱ्यांनी सोयाबीनवर पडणाऱ्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी महागामोलाची औषधे घेऊन फवारणी केली.
Palghar Rain: पालघर जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
पालघर जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तर एका भल्या मोठ्या झाडावर वीज पडली. त्यामुळे झाडाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. तर बाजूला असलेल्या घरांवर झाडाच्या फांद्या पडल्याने काही घरांचं नुकसान झालं.