Heavy Rain : मुसळधार पावसामुळे दाणादाण! वर्ध्यात सकाळपासून अतिवृष्टी; अनेक गावांना फटका, नदी, नाल्यांना पूर
Heavy Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर वर्धा जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Wardha News वर्धा : हवामान विभागाने वर्धा जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज सकाळपासून जिल्ह्याच्या आठ तालुक्यापैकी पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे हिंगणघाट तालुक्यातील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत, तर वर्धा - नागपूर महामार्गांवरील पवनार येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद झालीय. सोबतच पिपरी येथील पुलाखाली सुद्धा पाणी साचले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील गोविंदपूर येथील नाल्याला पूर आल्याने गावातील अनेक लोकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले आहे. अतिवृष्टी झालेल्या पाच तालुक्याच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तर संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता पावसामुळे कोणतेही नुकसान होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दमदार पावसाच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट
राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात दामदार पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. राज्यात आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. असेच काहीसे चित्र आता विदर्भात देखील बघायला मिळत आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट तर गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्याना पूर आला आहे. त्यामुळे परिसरात प्रशासन अलर्ट झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून जलाशयाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. परिणामी पुढील 48 तासात धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धरणात येणा-या पावसानुसार आणि आवश्यकतेप्रमाणे धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. कोरा,चिखली, डोंगरगाव,नारायणपूर,असोला गावकऱ्यांनी सतर्क रहावे असे, आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस असताना पाण्यात गाडी टाकू नये, याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे. पावसाच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट असून परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.
वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
शेतात भात लागवडीचं काम सुरू असताना विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसात वीज अंगावर कोसळली. यात एका महिला मजुराचा मृत्यू झाला. तर, तीन महिला गंभीर जखमी झाल्यात. अंतकला नेवारे (वय 50) असं मृतक महिलेचं नावं आहे. तर, जखमींमध्ये नीला कारंडे, विजया शरणागत, शशिकला शरणागत यांचा समावेश आहे. तिन्ही जखमींवर सिहोरा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना तुमसर तालुक्यातील मांगली शेतशिवारात घडली. वीज कोसळल्यानं मृत्यू झाल्याची ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. सोमवारला वीज कोसळल्यानं तिघांचा मृत्यू तर, चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या.
हे ही वाचा