Maharashtra Rain : कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेती कामांना वेग आला आहे. मात्र, जिथं अद्याप पावसानं दडी मारलीय, त्या ठिकाणचे शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, राज्यातील कोकणासह मुंबई, ठाणे परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात जोरदार पावसाची शक्यता
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्या आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागासह पालघर ठाणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अवर्ट देण्यात आला आहे.
नांदेड शहरात रात्री पासून दमदार पावसाची हजेरी
नांदेड शहरात रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली आहे. शेतीला जसाआवश्यक आहे तसा पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस
यवतमाळच्या आर्णी येथे रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे पाणी बाजार पेठेतील दुकानात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. रात्री आर्णी शहरात जवळ पास पाच तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील नाल्या तुडुंब भरले आहेत. पाणी दुकानात असल्याने दुकानातील साहित्यची नासधूस झाली. नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक व्यापाऱ्यांनी केला आहे. या भागातील नाल्या नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी स्थापना केल्यामुळे या ठिकाणी कचरा अटकून नाल्या तुडुंब भरल्या आणि हे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि घरात गेले.
गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस
गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गोंदिया शहराजवळून वाहणाऱ्या पांगोली नदीसह अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळं गोंदिया-आमगाव महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक छोट्या नाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. पुलावरुन पाणी वाहत असताना नागरिकांनी प्रवास करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: