Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Maharashtra Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहे. पावसाअभावी खरीपाची पीकं (Kharif crop) धोक्यात आली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मराठवाड्यासह विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मान्सूनचा आस हिमालय पायथ्याशीच स्थिरावल्यामुळं पावसाचा खण्ड कायम जाणवत आहे.
पुढील पाच दिवस या भागात पावसाची शक्यता
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टनंतर बंगाल उपसागरात पुन्हा जर एखादी वातावरणीय प्रणालीची निर्मिती होऊ शकते. तिचे मध्य भारतात (उत्तर छत्तीसगड दरम्यान) वायव्य दिशेने होणारे स्थलांतरण आणि परिणामकारक प्रभावामुळं महाराष्ट्रात पुढे पाऊस होऊ शकतो. कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजे 25 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मात्र केवळ मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. धरण जलसंवर्धन क्षेत्रातून आवक मंदावली असून धरण जलवाढ टक्केवारी मर्यादित झाली आहे. तरी देखील नाशिक आणि पुणे शहर पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस चांगल्या पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
पावसानं ओढ दिल्यामुळं खरीपाची पीकं धोक्यात
राज्यात आत्तापर्यंत 96 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या (kharif crop Sowing) पूर्ण झाल्या आहे. राज्यात सरासरी 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी केली जाते. आत्तापर्यंत 137 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मागील वर्षीच याच कालावधीत 140 लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या होत्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र थोड्या प्रमाणात घटलं आहे. सध्या पावसानं ओढ दिल्यामुळं खरीपाची पीकं धोक्यात आली आहेत. तसेच पावसानं ओढ दिल्यामुळं जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळं नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: