Maharashtra Rain : राज्यातील काही भागात चांगला पाऊस, कोकणात पावसाचा जोर कमी होणार
राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.
Maharashtra Rain : राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल आहे. तर पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणात मध्यम सरी बरसतील. तिथे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोकणामध्ये पावसाची संततधार
कोकणामध्ये सध्या पावसाची संततधार सुरु आहे.कोकणात प्रवास करताना नागमोडी वळणाचे घाट रस्ते आणि त्यात पावसात सह्याद्रीच्या खोऱ्यातून फेसळणारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सुरु असलेल्या पावसाच्या संताधारेने प्रवाहीत झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातीलच एक महामार्गावरचा चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील सवत-सडा धबधबा. हा धबधबा मुंबई-गोवा महामार्गावर असल्यानं इथे थांबून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी मनमुराद आनंद लुटत आहे. त्यातच विकेंड असला की इथे असंख्य पर्यटक या फेसाळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचा आनंद लुटतात.
अमरावती शहरासह अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस
अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. 15 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात समाधनकार पाऊस पडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट आले होते. मात्र, काल (8 जुलै) झालेल्या पावसामुळं दुबार पेरणीचा संकट टळलं आहे.
नंदूरबार जिल्ह्यातही चांगला पाऊस
जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजा आता सुखावला असून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येत आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आता पेरणी सुरुवात केली आहे. जिल्ह्यात जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक पेरणी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून यावर्षी सर्वाधिक कापसाचे लागवड केली जाणार आहे. तर दुसरीकडे भात लागवडीची तयारी करताना शेतकरी दिसून येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) शहरासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, आणि शिरोळ हे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मराठवाड्यातील अनेक भागात पावसाची हजेरी
जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यावर आता जुलै महिन्यात मात्र मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात जोरदार बरसताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील 67 मंडळांत पावसाळा सुरु झाल्यापासून आजवर दमदार पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टीची (Heavy Rains) नोंद झाली आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील 12 मंडळांत, जालन्यातील 3, बीडमधील 10, लातूरमधील 12, धाराशिव जिल्ह्यातील 4, नांदेड जिल्ह्यातील 16, परभणीतील 6, हिंगोली जिल्ह्यातील 4 मंडळांत आजवर अतिवृष्टीची नोंद झाली आहे.