Maharashtra Rain Live Updates : राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, जाणून घ्या पावसासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Rain Live Updates : राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Background
Maharashtra Rain Live Updates : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी पावसानं चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तसेच जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत.
दरम्यान, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, नाशिकचा घाट भाग, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. त्याचबरोबर नाशिक (Nahsik) जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यात कालपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
जालना जिल्ह्यातही पावसाची हजेरी
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहेत. वडीगोद्री परिसरात झाडे पडली असून घरावरील छप्पर देखील उडाले आहे. तसेच काही ठिकाणी घरावरील पत्रे देखील उडाले आहेत. दरम्यान बऱ्याच दिवसानंतर ओढ दिलेल्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळालं आहे.
Aurangabad: पावसाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही; फळांची मोठ्याप्रमाणावर गळती
Aurangabad : औरंगाबादमध्ये शुक्रवार आणि शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही बसल्याचं पाहायला मिळाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या झाडाला गळती लागली आहे. त्यामुळे झाडांखाली मोसंबीचा सडा पडला असल्याचे चित्र आहे. वारा अधिक असल्याने झाडाला लागलेले फळ गळून पडले. काही ठिकाणी गारा पडल्याने याचा फटका फळांना बसला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस, आर्वी ते वर्धमनेरी रस्ता बंद
Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्यानं आर्वी ते वर्धमनेरी हा रस्ता बंद झाला आहे. आज सकाळपासून वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.























