Maharashtra Rain Live Updates : उजनी धरणातील विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rain Live : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईत देखील पावसाची रिपरिपस सुरुच आहे. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी मात्र, या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होत आहे.
दरम्यान, आजही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज पालघर आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत. काल राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी या पावसामुळ वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं.
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली. रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाला. यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. दरम्यान, या पावसामुळं ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळं जिल्ह्यात काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. जळगाव जामोद , मोताळा , संग्रामपूर ,शेगाव , खामगाव तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली.
परभणीत पावसाची जोरदार हजेरी
परभणीत (Parbhani) पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले असून छोट्या मोठ्या नदी नाल्या ओसंडून वाहत आहेत. जिल्हाभरातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सुरू असलेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उजनी धरणातील विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pandharpur : उजनी धरणातील विसर्ग वाढवून 1 लाख क्यूसेक करण्यात आला आहे. वीरचा विसर्ग 15 हजार एवढांच ठेवण्यात आल्याने नागरिकांची चिंता परत वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
पंढरपूरच्या व्यास नारायण झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरले, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात
पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोचू लागल्याने हे पुराचे पाणी शिरू लागलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी मधील नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्यास सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी चंद्रभागा तीरावर असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. रात्री ही पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. पाणी किती वाढणार याचा नेमका अंदाज येत नसला तरी या भागातील बहुतांश घरात आज रात्री पाणी शिरण्याची शक्यता आहे. या भागातील जवळपास शंभर कुटुंबे तसेच महाद्वार घाटावर राहणारे काही कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.
अमरावतीमधील पिंगळाई नदीमध्ये तीन मच्छीमार बुडाले
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पिंगळाई नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेले तीन मच्छीमार बुडाल्याची घटना तिवसा तालुक्यात समोर आली आहे. दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध घेणे सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन मच्छीमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले असताना ते नदीत बुडाले. तिघेही तिवसा तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळतात तहसीलदार वैभव फरतारे घटनास्थळी दाखल झाले. तर जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तीनही मच्छीमारांचा शोध सुरू आहे.
मोठीं बातमी! जायकवाडी धरणातून 1 लाख 8 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग
जायकवाडी विसर्ग वाढ...
1) ठिक 16:30 ते 17:00 वा. दरम्यान द्वार क्र. 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन द्वारे 2.5 फुट उंचीवरुन 3.0 फुट उंचीवर स्थिर करुन गोदावरी नदीपात्रात 4716 क्युसेक विसर्ग वाढ करण्यात येईल
2) ठिक 17.00 ते 17.30 वा.दरम्यान द्वार क्र. 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन द्वारे 3.0 फुट उंचीवरुन 3.5 फुट उंचीवर स्थिर करुन गोदावरी नदीपात्रात 4716 क्युसेक विसर्ग वाढ करण्यात येईल.
(नियमित गेट क्र. 10 ते 27 असे एकुण 18 गेट 4.0 फुट उंचीवर उघडलेले आहेत.)
अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात
सांडव्याद्वारे 99036+4716+4716=108468 क्युसेक असा एकुण 10 लाख 8 हजार 468 क्युसेक विसर्ग सुरू राहील.
आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल.
धोम बलकवडी धरण 100 टक्के भरलं, वाईच्या गणपती मंदिरात पाणी
वाईच्या गणपती मंदिरात पाणी आले आहे. धोम धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदील पूर आला आहे. पाऊसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडण्यात येणार आहे. धोम बलकवडी धरण 100 टक्के भरले आहे.