Rain Alert : आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Maharashtra Weather Update : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकण आणि मराठवाड्यात 24 तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकणात काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
याशिवाय, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांनाही पाऊस झोडपणार आहे. या ठिकाण वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/2BQtg391b5
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 17, 2024
या भागात 20 जूनपर्यंत तापमान वाढणार
मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असली, तरी बहुतांश भागात पाऊस सुट्टीवरच राहणार आहे. मुंबई, ठाण्यात काही तुरळक ठिकाणं वगळता इतर भागात पाच दिवस पावसाची शक्यता नाही. या भागांत 21 जूननंतरच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईत अनेक भागांत पुढील पाच दिवस तापमान वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज तापमान कसं असेल?
पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 34°C आणि किमान तापमान 28°C च्या आसपास असेल.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.