पुण्याच्या भोसरी, आकुर्डीत बत्ती गुल, 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प
Pune News : पिंपरी- चिंचवडमधील भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे.
पिंपरी- चिंचवड : महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्याने पुण्याच्या भोसरी आणि आकुर्डीत बत्ती गुल झाली आहे. जवळपास 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. 100 मेगावॅट क्षमतेच्या ट्रान्स्फॉर्मरमध्ये सकाळपासून बिघाड झाला आह. उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारव्यवस्थापन शक्य होत नसल्याने पर्यायी वीजपुरवठ्याची सोय देखील उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु आहे.
भोसरीमधील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रामध्ये 100 एमव्हीए क्षमतेचे दोन व 75 एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र त्यातील 100 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण 26 वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र यातील 100 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण 10 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला.
प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. महावितरणकडून याबाबत संबंधित सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे.
महापारेषणकडून बिघाड झालेल्या 100 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची सध्या तपासणी सुरु आहे. त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या 220 केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव 75 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील 16 वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या 10 वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे. या कालावधीत भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने भोसरी विभागात चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागणार आहे.
संबंधित बातम्या :