Pune Crime : एकीकडे प्रचाराचा धुराळा दुसरीकडे चोरांनी केला हात साफ; कसब्यात 6 घरफोडीचे प्रयत्न
कसब्यात पोटनिवडणुकीच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा रस्त्यावर चोख बंदोबस्त तैनात आहे. परंतु असं असताना देखील कसबा मतदार संघात सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
Pune Bypoll election : कसबा आणि चिंचवड विधानसभा (Kasba Bypoll Election) पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणूक काळात कसबा मतादार संघात विविध पक्षाचे बडे नेते विविध भागात प्रचारात उतरत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या (Crime) कारणास्तव पोलिसांचा रस्त्यावर चोख बंदोबस्त तैनात आहे. परंतु असं असताना देखील कसबा मतदार संघात सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. कसबा भागात पोलिसांकडून वाहनांची तपासणी आणि चोख बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी दोन सदनिकांमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज चोरी केल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान घडला. या संदर्भात सतीश मनोहर कामतकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसबा मतदार संघातील शाळीग्राम प्रसाद अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील कामतकर यांची सदनिका असून, ती बंद होती. चोरट्यांनी या सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात तोळे सोन्याचे दागिने, चांदी आणि 30 हजार रुपयांची रोकड लांबवली. तसंच याच परिसरातील बाकी सदनिकेतून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा तीन लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. यासोबतच चोरट्यांनी इतर चार सदनिकांमध्येही घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमुळे प्रचाराची धामधूम सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत घरफोड्या झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांना तुरी देऊन चोरट्यांनी केला हात साफ
पुण्यातील कसबा मतदार संघात दररोज भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आणि रोड शो आयोजित करण्यात येत आहेत. नेते मंडळींच्या सभा म्हटल्यावर कसबा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोज अनेक पोलीस रस्त्यावर असतात. मात्र याच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रचाराचा धुराळा
पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात तगडी लढत आहे. त्यामुळे प्रचारासाठी राज्यातील सर्वपक्षीय बडे नेते मैदानात उतरले आहे. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेतेदेखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. रॅली आणि रोड शो जल्लोषात पार पडत आहेत.