(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : नक्की आदेश कोणाचा? विधानभवनातील शिवसेना कार्यालयाला टाळे
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानभवनातील शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे. मात्र हा आदेश कोणी दिला, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
Maharashtra Politics Shivsena : विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने येणार आहे. मात्र, त्याआधीच मोठी घडामोड विधीमंडळात घडली आहे. विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे. शिंदे गटाने ही कुरघोडी की शिवसेनेने त्यांना रोखण्यासाठी ही सूचना केली याबाबत चर्चा सुरू आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा आमचा असून दोन तृतीयांश आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम विधीमंडळातील पक्षाच्या दालनावरही दिसून येत आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळविल्यामुळे दालन बंद ठेवण्यात आल्याची सूचना लावण्यात आली आहे. या पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.
शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करत राज्यात नवीन सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटाने आपल्याकडे शिवसेनेच्या 39 आमदारांसह 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आज राज्यपालांच्या आदेशानंतर विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार असून त्यानंतर बहुमत चाचणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे.
>> कोकणातील शिवसेनेचं निष्ठावान नेतृत्व राजन साळवी (Know About Rajan Salvi)
> राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत.
> साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
> 2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
>> कोण आहेत राहुल नार्वेकर (Know About Rahul Narvekar)
> शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
> तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
> 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
> 2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
> राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांचे जावई