Maharashtra Politics Ajit Pawar: जयंत पाटील म्हणतात, पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; अजितदादा म्हणाले...
Maharashtra Politics Ajit Pawar: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा अशी भूमिका जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी त्याचे स्वागत केले आहे.
Maharashtra Politics Ajit Pawar: महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच (NCP) होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते यावर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता, अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या तोंडात साखर पडो, असे म्हटले.
मागील काही दिवसांपासून राज्यातील काही शहरांमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यापूर्वी एका मुलाखतीत अजित पवार यांनीदेखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवार यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याने अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
View this post on Instagram
बावनकुळे यांना लगावला टोला
दरम्यान, अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला. पोस्टर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही, अशा आशयाची टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर, मुख्यमंत्री होण्यासाठी बावनकुळे यांचा सल्ला घेणार असल्याची मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. सोमवारी मुंबईत असून त्याठिकाणी भेटल्यास अथवा नागपूरमध्ये जाऊन बावनकुळे यांच्याकडून मार्गदर्शन घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले. मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं आणि कसं काम केल्यावर आपल्या पक्ष आपल्याला तिकीट देतो कसं काम केलं नाही तर तिकीट नाकारतो आपल्यालाही नाकारतो बायकोला देखील नाकारतो. या सगळ्यांची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे बावनकुळेंकडून घेतो आणि त्यांचा मोलाचा सल्लादेखील घेतो, असं ते म्हणाले.
बारसूला मी स्वत: जाणार
बारसू रिफायनरी प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर अजित पवार म्हणाले की बारसूमध्ये मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सत्ता कोणाची ही असो आपण त्यात सकारात्मक गोष्टीने बघायला हवं. या प्रकरणात शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. स्थानिकांचं मत जाणून घेणार आहे. राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी राज्यात मोठे प्रकल्प आणले पाहिजे. मात्र हे सगळं करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. कोकणात लोक फिरायला जातात. राहायला जातात त्यांना त्रास होणार नाही हे बघायला हवं, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले.