(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय; भाजप, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीचं काय होणार? भाजप, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party-NCP ) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल घेतलेल्या राजकारणातून निवृत्त होत असल्याचा घेतलेला निर्णय जाहीर केला आणि राजकारणात मोठा भूकंप झाला. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्ष राजकीय गणितं सोडवण्यात व्यस्त आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय म्हणजे. राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणं घाई होईल, असं फडणवीस म्हणाले.
राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, शरद पवार यांच्या राजकारणाला अनेक पैलू आहेत. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटासह भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
पवारांच्या निवृत्तीची घोषणा का महत्त्वाची?
लोकसभेच्या जागांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या घोषणेला अनेक अर्थ आहेत.
2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. जवळपास सर्वच विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले आहेत. त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. अशातच राज्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा एक भाग आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी व्यतिरिक्त काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत जागावाटप कसे होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळत आहेत. तेव्हापासूनच 2019 मध्ये जसा पहाटेचा शपथविधी झाला होता. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतं, अशा चर्चांना उधाण आलं होतं, मात्र शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि भाजपनं एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे पायउतार होणार आणि त्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासूनच राज्यात लवकरच राष्ट्रवादी, भाजपचं सरकार येणार असल्याच्या चर्चा सरू आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या शरद पवारांच्या घोषणेनं पक्षाच्या ताकदीला एक आधार मिळाला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात कारस्थान करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळालं असून, पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी ते अनेक वेळा विचार करतील, असं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे.