Mahavikas Aghadi: अमरावतीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठी राजकीय खेळी; 'आंबेडकर विरूद्ध आंबेडकर' रंगणार सामना?
Amravati Lok Sabha: अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने मोठा राजकीय डाव टाकण्याचा तयारीत आहे. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर पाठोपाठ आता दुसरा 'आंबेडकर' गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहे.
Amravati Lok Sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Lok Sabha Constituency) महाविकास आघाडी मोठा राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहे. अमरावती लोकसभेसाठी (Amravati Lok Sabha) मविआच्या आनंदराज आंबेडकरांना (Anandraj Ambedkar) मैदानात उतरविण्याच्या हालचालींना वेग आले आहे. आनंदराज आंबेडकर हे प्रकाश आंबेडकरांचे सख्खे लहान बंधू असून ते देखील अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती पुढे आली आहे.
'आंबेडकर विरूद्ध आंबेडकर' रंगणार सामना?
मविआतील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्याचा आनंदराज आंबेडकरांना प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात आनंदराज आंबेडकरांशी अनिल देशमुखांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आनंदराज आंबेडकरांची भेट घेणे टाळल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांना सोबत घेत प्रकाश आंबेडकरांना शह देण्याचा मविआचा विचार आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
मविआच्या डावावर प्रकाश आंबेडकरांनी हा प्रतिडाव?
आनंदराज आंबेडकर यांचा 'रिपब्लिकन सेना' हा पक्ष आहे. शिवाय आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर या घडामोडीची कुणकुण वंचितला लागल्याचीही चर्चा आहे. त्यामूळेच अमरावतीतून सुजात आंबेडकरांनी निवडणूक लढविण्याची पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची प्रदेश कार्यकारिणीला शिफारस करण्यात आलीये.
मविआच्या डावावर प्रकाश आंबेडकरांनी हा प्रतिडाव तर टाकला नाही ना, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संदर्भात नुकतेच सुजात आंबेडकरांनी भाष्य करत पक्षाने सांगितले तर अमरावतीतून नक्की लढू, असे सुतोवाच केलेत. तर सुजात यांच्या उमेदवारी संदर्भात वेळेवर निर्णय घेऊ, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अमरावतीत 'आंबेडकर विरूद्ध आंबेडकर' हा सामना रंगणार का? याबद्दल राजकीय वर्तुळातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभेच्या मैदानात?
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अमरावतीतील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. शिवाय, अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीकडे हा प्रस्ताव पाठवलाय.
इतर महत्वाच्या बातम्या :