Rohit Pawar : 'भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला, डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय'; रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
Rohit Pawar On BJP : भाजप प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दिल्लीत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीकेची झोड उठत आहे.
Rohit Pawar On BJP : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशात वाद निर्माण झाला. याच्या विरोधात भाजपनेही राज्यभर आंदोलन केलं. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आता राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या 'शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली', या वक्तव्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रातून टीकेची झोड उठत आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विट करत भाजपवर कडक शब्दात टीका केली आहे.
भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला- रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे, "छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2022
आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना?
पण आता डोक्यावरून पाणी चाललंय.
त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय. pic.twitter.com/ilfAYBGh0o
ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा मुद्दा'
वीर सावरकरांच्या मुद्द्याविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले होते, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात फूट पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत आहे. सावरकर यांच्याविषयी माझा फारसा अभ्यास नाही. परंतु या प्रकरणी सर्वपक्षीयांसह विचारवंतांनी एका व्यासपीठावर येत चर्चा घडवून आणावी. खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात राजकारण बाजूला ठेवून राहुल गांधी यांनी दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखाण समजून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला? हे मला माहित नाही. परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे ते म्हणाले.
..तर राज्यपालांनी या राज्यात राहू नये - रोहित पवार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, राज्यपालांनी त्यांची वैचारिक पातळी दाखवलेली आहे. त्यांच्याकडे संविधानिक पद आहे. म्हणून त्या पदाकडे पाहतो. या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले अशा अनेकांबद्दल बोलून त्यांनी त्यांची वैचारिक पातळी दाखवलेली आहे. परत एकदा त्यांनी तेच धाडस केलेलं आहे, आम्ही त्याचं निषेध करतो. महाराष्ट्राच्या संस्कृती विरोधात जाऊन ते असं वागत असतील तर त्यांनी या राज्यात राहू नये. असं मला वाटतं. माझ्या सह तमाम जनतेचं हेच मत आहे.
शिवाजी महाराजांच्या बाबतीतला प्रश्न आला की तुम्ही गप्प का बसता?
राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात सावरकरांच्या समर्थनार्थ सत्तेतील मंडळींनी मोठं आंदोलन केलं. त्याबद्दल मी फार बोलणार नाही, माझा त्याबाबतचा अभ्यास कमी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतला प्रश्न आला की तुम्ही गप्प का बसता? तुम्ही जर सिलेक्टिव्ह बोलणार असाल तर त्याचा ही निषेध करतो. सत्तेतील मंडळी याबाबत अद्याप ही काही बोलत नाही. याची खंत आहे. असं रोहित पवार म्हणाले. राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांचं प्रेम आहे असंच आम्हाला दिसतं. स्वतःच्या हिताचं प्रेम हे यातून दिसतं.
थोर व्यक्ती भाजपवाल्यांना आवडत नाहीत का?
भाजप प्रवक्त्यांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, सध्या डोक्यावरून पाणी गेलेलं आहे, त्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवायला हवं. थोर व्यक्ती भाजप वाल्यांना आवडत नाहीत का? असा प्रश्न विचारला जातोच. कारण थोरांचा अवमान करणं लोकांना पटत नाही. भाजपचा कादंबरी लिहिणाऱ्यांवर खूप विश्वास आहे. त्यांनी पुरावे दाखवावेत. मग आपण बोलू. जरा इतिहासकारांना विश्वासात घ्या. उगाच कादंबरीकारांना पुढं करून काय उपयोग? असं रोहित पवार म्हणाले
असे वक्तव्य करणारा ठार वेडाच- जितेंद्र आव्हाड
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधत ट्विट केले आहे, त्यात ते म्हणतात, शिवाजी महाराजांवर भाजपकडून असे वक्तव्य करणारा ठार वेडाच असू शकतो.
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली - सुधांशु त्रिवेदी
भाजपच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वातावरण तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रे लिहिली होती. त्रिवेदी म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut: शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का? ठाकरे गट आक्रमक; जोडे कसे मारतात हे दाखवून देऊ, राऊतांचा इशारा