Maharashtra Political Crisis : पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच; एकनाथ शिंदे गटाचे स्पष्टीकरण
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात परिस्थिती नीट झाल्यावर आम्ही मुंबईत येऊ, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार दिपक केसरकर म्हणाले.

मुंबई : आम्ही आजही शिवसेनेत (Shivsena) आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असं भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
गटनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय चुकीचा
एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव कायदेशीर नाही, असं केसरकर यांनी म्हटलं. शिवसेनेतच राहून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार आहे. शिवसेनेकडे 55 आमदार होते. आता आमच्या 50 आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ आहे. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे अशा नेत्याला गटनेतेपदावरून हटवू शकत नाही. गटनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय चुकीचा आहे, त्याविरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहे.
आजही आम्ही शिवसेनेचे सदस्य
उद्धव ठाकरे यांनी आम्ही या अगोदरही सांगितले होते. आम्हाला महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही. आम्ही कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नाही. आजही आम्ही शिवसेनेचे सदस्य आहोत. बाळासाहेबांचे विचार मांडणारे आम्ही एकत्र आल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे.
आमच्या पक्षाचे नाव शिवसेनाच
एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असं शिंदे गटाचं नाव ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आमच्या पक्षाचे नाव शिवसेनाच आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार आहे, असे म्हणत गटाचं नाव ठरल्याच्या चर्चांवर पडदा टाकला आहे.
परिस्थिती नीट झाल्यावर आम्ही मुंबईत येऊ
महाराष्ट्रात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावर येण्याची गरज नाही. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच परिस्थिती नीट झाल्यावर आम्ही मुंबईत येऊ असे देखील ते या वेळी म्हणाले.
आम्ही भाजपसोबत गेल्याच्या चर्चा सुरू आहे. मात्र आमचा गट सध्या कोणत्याही पक्षासोबत नाही, असे केसरकर यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
