Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलैला
Supreme Court : शिवसेनेच्या वतीने अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवारी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर याचिकांची सुनावणी होणार.
Maharashtra Political Crisis, Supreme Court : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Political Crisis) ढवळून निघाले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला... एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी करता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. आता महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलै रोजी घटनापीठासमोर होणार आहे.
शिवसेनेच्या वतीने अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर बुधवारी 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर याचिकांची सुनावणी होणार आहे. रमण्णा यांच्याशिवाय न्यायाधीश कृष्णा मुरारी आणि न्यायाधीश हिमा कोहली उपस्थित असतील.
#BREAKING
— Prashant Kadam (@_prashantkadam) July 17, 2022
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी 20 जुलैला
अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या वतीने दाखल याचिकांवर बुधवारी होणार सुनावणी
सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होणार याचिकांची सुनावणी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. मात्र त्याआधी शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. त्याला आव्हान देत शिंदे गटाने शिवसेनेच्या कारवाईच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्यावतीनेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
>> सुप्रीम कोर्टात कोणत्या याचिकांवर सुनावणी प्रलंबित?
> 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला शिंदे गटाचं आव्हान
> एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान
> विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका
> विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान
> एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला आव्हान
> एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान
BREAKING| Supreme Court Bench Led By CJI To Hear Petitions Related To Shiv Sena Rift On July 20 https://t.co/ZXYmB7SwLh
— Live Law (@LiveLawIndia) July 17, 2022