Maharashtra Political Crisis : 30 तारखेला राज्यपालांकडून विशेष अधिवेशन? भाजपकडून राज्यपालांची भेट
भाजपच्या नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षामध्ये आता एक मोठी बातमी आली असून भाजपकडून राज्यालांना बहुमत चाचणीसाठी पत्र देण्यात आल्याची माहिती येत होती. बहुमताच्या पत्राची ही बातमी चुकीची असल्याचं समोर आलं आहे. या संबंधी राजभवनानेही कोणताही आदेश जारी केला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी 30 तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती आली होती. या संबंधी एक पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलं तरी या पत्रावर कोणाचीही सही नाही.
शिवसेनेची बंडखोरी ही त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे असं सांगत आतापर्यंत त्यापासून हात झटकणारा भाजप आता अचानक या सत्तासंघर्षाच्या केद्रस्थानी आला आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर लागोलाग फडणवीस हे दिल्लीमध्ये आले आणि संध्याकाळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक बोलावली. भाजप नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर या नेत्यांनी थेट राजभवन गाठलं आणि राज्यपालांची भेट घेतली.