Sanjay Raut : संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य, गुवाहाटीमधून 40 आमदारांचे 'मृतदेह' येतील
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वादंग उभा राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Political Crisis Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कठोर टीका करताना धक्कादायक वक्तव्य केले. गुवाहाटीला गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत आणि ही जिवंत प्रेतं आता मुंबईत येतील, तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आणि यावरुनच आता देशभर गदारोळ होतोय.
बंडखोरांविरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने बंडखोरांविरोधात संघटनात्मक मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईतील दहिसरमधील शिवसेना मेळाव्यास संबोधित करताना शिवसेन नेते संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी म्हटले की, 40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले असल्याचेही वक्तव्य राऊत यांनी केले. राऊत यांच्या या वक्तव्यावरून आणखी राजकारण तापणार असल्याचे म्हटले जात आहे.
किरीट सोमय्या काय करणार?
संजय राऊत यांनी यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली. किरीट सोमय्या आता बेरोजगार होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. सोमय्या दररोज सकाळी वृत्तवाहिन्यांवर प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव, यामिनी जाधव यांना तुरुंगात पाठवणार असल्याचे म्हणायचे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी ईडीचे प्रकरण मिटवले असून आपण सुरत जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितल्याचेही राऊत यांनी म्हटले. माझ्यावर ईडीची कारवाई झाली. राहते घर, वडिलोपार्जित जमीन जप्त करण्यात आली. लहान मुलींवर ईडीची कारवाई झाली. मात्र, आम्ही गुडघे टेकले नसल्याचे राऊत यांनी म्हटले.
बंडखोर आमदारांच्या घरांना आता केंद्राची सुरक्षा
बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे.