(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाच्या निकालासाठी उरले फक्त पाच दिवस, 'या' तारखा सर्वाधिक महत्त्वाच्या
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 8 ते 12 मे या काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच तारखांकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचं लक्ष लागलंय.
Maharashtra Political Crisis: कधी लागणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल?.संपूर्ण महाराष्ट्राला सध्या हा प्रश्न पडलेला आहे. पण आता ही प्रतीक्षा जवळपास संपत आली आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवणार आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आता केवळ चार ते पाच तारखाच उरल्या आहेत. 8 ते 12 मे या काळात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच तारखांकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचं लक्ष लागलंय.
ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, ते पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं. त्यापैकी एक न्या. एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे निकाल यायचा असेल तर त्याच्याआधीच येणार हे उघड आहे. न्यायमूर्तींच्या निवृत्तीचा शेवटचा दिवस हा समारंभाचा असतो. अगदी त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता तशी कमी असते. 13 आणि 14 मे रोजी शनिवार आहे. त्यामुळे 8 ते 12 याच तारखांमध्ये निकालाची शक्यता अधिक आहे.
घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा.. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे हे दोन्ही निकाल एकाच दिवशी येतात की एक आधी एक नंतर...हेही पाहावं लागेल.
राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा (Supreme Court Result) आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. पण सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. 10 मे रोजी मतदान आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतर (Karnataka Assembly Election) येतो का याची उत्सुकता आहे. तसं झालं तर 11 आणि 12 मे या दोन तारखा आणखी महत्वाच्या ठरतात.
हे ही वाचा :