शिवसेनेचा पहिला बंड झाला होता नाशिकमधून, 30 वर्षांपूर्वी भुजबळ झाले होते 'बंडवीर'
Maharashtra Political Crisis : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे.
Maharashtra Political Crisis : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचे समजतेय. शिवसेनेच्या इतिहासातील हा चौथा मोठा बंड आहे. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे.... पण शिवसेनेच्या पहिल्या बंडाची ठिणगी नाशिकमधून पडली होती.. 1991 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेत असताना शिवसेनेला घाम फोडला होता.
विधान परिषद निवडणूक पार पडली. अन बंडाची ठिणगी पडली. मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन मुक्काम पोस्ट गुजरात गाठले. आणि त्यानंतर सुरू झाली शिवसेनेला नामोहरम करण्यासाठीचे 'ऑपरेशन लोटस'. मात्र ही बंडखोरी काही पहिल्यांदा झाली नाही तर या बंडाची बीजे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये रोवली आहेत. आजच्या सारख्याच घडामोडी त्यावेळी घडत होत्या, मात्र केंद्र नाशिक होते.
झालं काय की, त्यावेळी राज्यात सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. मात्र त्यावेळी सत्तेची प्रबळ दावेदार शिवसेनेला मानण्यात येत होते. 1991 मध्ये सेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांनी बंड केले. आणि याची सुरवात नाशिकमधून सुरू झाली.
आजच्या सारख गुजरात महत्वाचं केंद्र ठरून गुप्त बैठका, चर्चा, आमदारांची सुरक्षा ही सगळी कामे नाशिकमधून करण्यात येत होती. त्यामुळे नाशिकला विशेष राजकीय घडामोड सुरू होती. राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि महात्मा फुले यांच्याविषयी अवमानकारक लिखाणाच्या विरोधात दुखावलेले छगन भुजबळ यांनी सेनेला हादरा देण्याचा निर्णय घेतला. व 54 आमदारांपैकी 18 आमदारांना घेऊन सेनेला जय महाराष्ट्र केला.
छगन भुजबळांनी केलेले बंड हे शिवसेनेच्या कारकिर्दीतील पहिले बंड असल्याने याचा चांगलाच गाजावाजा झाला. त्यानंतर आता तीस वर्षांनंतर विश्वासू नेते असलेली एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेला पुन्हा एकदा ठेच लागली आहे.
भुजबळांना मंत्रिपद -
भुजबळांनी बंड केल्यानंतर 18 पैकी सहा आमदार शिवसेनेत परतले. तर 12 आमदारांसह छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना महसूलमंत्री हे पद देण्यात आले. तर त्यांच्या समवेतचे डॉ. गोडे यांना राज्यमंत्री पद देण्यात आले.