Maharashtra Political Crisis : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदार नॉट रिचेबल, पण काँग्रेसकडून अफवा असल्याची माहिती
Congress : काँग्रेसची डोकेदुखी वाढली असून त्यांचे पाच आमदार नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं आहे. पण ही अफवा असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे समर्थक शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल असताना आता पाठोपाठ काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल असल्याचं समोर येतंय. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं होतं. दरम्यान यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देत ही अफवा असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान हे नॉट रिचेबल आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची संख्या पाच असून ते कोणत्या ठिकाणी आहेत हे कुणालाच माहिती नाही. पण आपले 44 आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचं समोर आलं. त्यांच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतंही मिळवता आली नव्हती. त्यातच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेनी बंड पुकारलं. त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत बोलावलं होतं.
या पाच आमदारांशी काँग्रसच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे. उद्या कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होत असून त्या बैठकीला आता सर्व आमदार उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती
एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सुरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार तसेच भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि आमदार रविंद्र पाठक हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. या दोघांवर एकनाथ शिंदे यांचे मन वळवून पुन्हा मुंबईला आणण्याची जबाबदारी आहे. तसं जरी नाही घडलं तरी इतर समर्थक आमदारांना परत आणण्याचे प्रयत्न हे नेते करणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये असून त्यांना आणि समर्थक आमदारांना अहमदाबादला एअर लिफ्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामागे दोन कारणं आहेत, एक म्हणजे केंद्रीय मंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा हे त्यांची भेट घेणार आहे. दुसरं म्हणजे शिवसेनेचे नेते सुरतमध्ये येत असल्याने त्यांची आणि एकनाथ शिंदे यांची भेट होऊ नये यासाठी गुजरात भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.