Ashadhi Wari 2022 : माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान, 20 जूनला पोहोचणार
Dnyaneshwar Mauli Palkhi Prasthan 2022: श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या अश्वाचे बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले आहे.
Dnyaneshwar Mauli Palkhi Prasthan 2022: कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीत मोठा खंड पडला होता. मात्र आता कोरोना आवाक्यात आला असून शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. अशातच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या अश्वाचे बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झाले आहे.
गेल्या अडीचशे वर्षापासून अंकली येथील अंकलीकर सरकारांच्या कडून माऊलीचा मानाचा अश्व श्री आळंदीकडे पाठवण्याची परंपरा आहे. सकाळी उर्जित सिंह राजे शितोळे आणि कुमार महादजी राजे शितोळे यांच्या हस्ते राजवाड्यात विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर माऊलीच्या अश्वाचे विधिवत पूजन करण्यात आले. पूजन झाल्यानंतर माऊलींच्या अश्वाने अंकलि येथील राजवाड्यातून तून प्रस्थान केले. अंकली गावात मानाचा अश्व जाण्याच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी सडा घालून आरती करण्यात आली. मानाच्या अश्वांसोबत असणाऱ्या वारकऱ्यांनी माऊलीचा गजर करत फुगडी खेळली. माऊलींचा मानाचा अश्व श्री क्षेत्र आळंदी येथे 20 जून रोजी पोचणार आहे.
तत्पूर्वी वारीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होत. ज्यानुसार, मंगळवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. बुधवार दिनांक 22 आणि गुरुवार दिनांक 23 रोजी पुणे, शुक्रवार दिनांक 24 आणि शनिवार दिनांक 25 रोजी सासवड, रविवार दिनांक 26 रोजी जेजुरी, सोमवार दिनांक 27 रोजी वाल्हे, मंगळवार दिनांक 28 आणि बुधवार दिनांक 29 रोजी लोणंद, गुरुवार दिनांक 30 रोजी तरडगांव, शुक्रवार दिनांक 1 आणि शनिवार दिनांक 2 जुलै रोजी फलटण, रविवार दिनांक 3 रोजी बरड, सोमवार दिनांक 4 रोजी नातेपुते, मंगळवार दिनांक 5 रोजी माळशिरस, बुधवार दिनांक 6 रोजी वेळापूर, गुरुवार दिनांक 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दिनांक 8 रोजी वाखरी तर शनिवार दिनांक 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार असल्याचं सांगण्यात आलं होते.