Maharashtra Omicron Cases: राज्यात आज ओमायक्रॉनच्या 121 रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण नागपुरात आढळले
Maharashtra Omicron Cases: राज्यात आतापर्यंत 8081 लोकांची ओमायक्रॉनची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 7179 अहवाल प्राप्त झाले आहेत.
मुंबई: राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत काहीशी चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. राज्यात आज ओमायक्रॉनच्या 121 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 3455 रुग्णांची नोंद झाली आहे तर 2291 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 8081 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 7179 अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 902 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यात आज नागपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 82 रुग्णांची नोंद झाली आहे. तर वर्धा जिल्ह्यात 14, पुणे महापालिका क्षेत्रात 9, सिंधुदुर्गमध्ये 8 रुग्णांची भर पडली आहे. धुळे, लातूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी 2 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज 894 रुग्णांची वाढ झाली असून 45 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 12 हजार 233 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्के आहे. सध्या राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईत 429 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 822 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 698 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 949 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 109 दिवसांची वाढ झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha