Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
Maharashtra Budget Session : राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीच्या कारणामुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे पुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुढच्या वर्षी 28 फेब्रुवारीला राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. नागपूरमध्ये न होणारे हिवाळी अधिवेशन आणि अधिवेशनाचा कमी कालावधी यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ झाला आहे.
राज्यपालांच्या मंजुरीशिवाय होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
दरम्यान, मुंबईत सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या निवडणुकीत होणाऱ्या गुप्त मतदान पद्धतीत बदल करून आवाजी पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. आघाडी सरकारच्या या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. परंतु, आवाजी मतदानानं निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. असा उल्लेख राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केला आहे. असे असली तरी राज्यपालांनी मंजुरी दिली नाही तरी निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे पत्रही राज्यपालांना पाठवले आहे.
विधीमंडळाने नियम बदलले ते विधीमंडळाचे अधिकार आहेत अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात आज सायंकाळपर्यंत राज्यपालांनी मंजुरी द्यावी असा पुनरुच्चार करण्यात आला आहे.