Maharashtra News : केंद्रीय तपास यंत्रणेला राज्य सरकारचे उत्तर, विरोधात भूमिका घेणाऱ्यावर राज्यभर गुन्हे दाखल करण्याचा फंडा
Maharashtra News : महाविकास आघाडीनेही विरोधकांवर कारवाईचा धडाका लावला. महाविकास आघाडीच्या डझनभर नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु आहे.
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ही आता चांगलीच कंबर कसली आहे. एवढच नाही तर अगोदरच्या तक्रारी काढून त्यावर कारवाई करायाला सुरवात केली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेणा-यांच्या विरोधात राज्य सरकारने ही कारवाईचा बडगा सुरु केला आहे. कारवाई करताना मात्र महाराष्ट्र दर्शन घडवण्याची संधी ही पोलीस सोडत नाही.
महाविकास आघाडीने ही विरोधकांवर कारवाईचा धडाका लावला. महाविकास आघाडीच्या डझनभर नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. तर अनिल देशमुख आणि नवाब मालिक या मंत्र्यांना तुरुंगात जावं लागलं. याच केंद्र सरकारच्या कारवाईला महाविकास आघाडी सरकार जशास तसं उत्तर देताना पाहायला मिळतय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे केंद्राच्या कारवाईला उत्तर दिलं त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करताना पाहायला मिळते.
महाविकास आघाडीच्या विरोधात भूमीका घेणा-या नेत्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक होत कारवाई करताना पाहायला मिळते. पण फक्त एकच ठिकाणी कारवाई नाही तर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करून कारवाई होताना पाहायला मिळते आणि मागची प्रकरणे ही काढून त्यात कारवाईचा बडगा सुरु आहे. सध्या सुरु असलेल केतकी चितळे प्रकरण, गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य, प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोणावर कसे गुन्हे दाखल झाले?
केतकी चितळे-
केतकी चितळेने शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केली आणि राज्यभरात गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. या प्रकरणी केतकीला पोलिसांनी कारवाई करून अटक ही केली. मात्र राज्याच्या विविध भागातून गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरुच आहे. केतकीच्या विरोधात आतापर्यंत जवळपास 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. केतकी चितळेवर पहिला गुन्हा 14 मे 2022 ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत.
ॲड. गुणरत्न सदावर्ते
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर सातारा, कोल्हापूर, अकोला आणि सोलापुरात ही विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर अनेक पोलिस स्टेशनने सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मागणी केल्याने 18 दिवस तुरुंगात राहवं लागलं. यामध्ये एक वर्षापूर्वीची ही प्रकरणे उकरुन काढून त्यात कारवाई होताना पाहायला मिळाली.
राणा दाम्पत्य
मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा येऊन म्हणणार असल्याचं आव्हान राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिल्यानंतर दोन दिवस मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर राणा दाम्पत्याच्या विरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तब्बल 12 दिवस राणा दाम्पत्याची तुरुंगवारी करण्यात आली. आणि एवढ्यावरच थांबलं नाही तर मुंबई महानगरपालिकेला अचानक जाग आली आणि अनाधिकृत बांधकाम म्हणून कारवाईची नोटीस ही पाठवण्यात आली.
नारायण राणे
मुख्यमंत्री यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातच शरद पवार यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरोधात ही गुन्हे दाखल करण्यात आले. एवढच नाही तर राणे यांच्या बंगल्याला अनाधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाईची नोटीस पाठविण्यातआली.
अर्णब गोस्वामी
वारंवार मुख्यमंत्र्यांना आव्हान देणा-या अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात ही गुन्ह्यांची मालिका सुरु झाली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर टीआरपी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल, वांद्रे येथे गर्दी जमवल्याच्या संबंध थेट मशिदी जोडल्याने गुन्हा दाखल, पोलीस दलाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. एवढच नाही तर विधानसभेत शिवसेना आमदारांनी अर्णब यांच्या विरोधात हक्कभंग आणला.
कंगणा रनौत
अभिनेत्री कंगणा रनौतने अनेकदा शिवसेनेवर टीका केली. अनेक वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुन्हे दाखल केले. एवढच नाही तर अनेक दिवसांपासून असलेल्या कंगणाच्या कार्यालयाला नोटीस पाठवून महापालिकेने हातोडा देखील चालवला.
ही जरी प्रतिनिधिक स्वरूपाची उदाहरणे असली तरी प्रवीण दरेकर, मोहित कंबोज आणि अनेक सोशल मीडियावर वादग्रस्त लिहाणा-यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र प्रकारची सर्व प्रक्रिया ही असंविधानिक असल्याचे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.