Pune Year End 2022 : सरत्या वर्षात पुणेकरांनी 'या' दिग्गजांना गमावलं...
पुणे हे राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी आहे. त्यामुळे पुण्यात अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचं वास्तव्य आहे. त्यातील काही मंडळींंना 2022 मध्ये पुणेकरांनी गमावलं आहे. त्यांच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
Pune Year End 2022 : पुणे हे राजकीय, ऐतिहासिक (pune) आणि सांस्कृतिक नगरी आहे. त्यामुळे पुण्यात अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचं वास्तव्य आहे. अनेक मंडळींचा जन्म पुण्यात झाला आहे तर अनेक मंडळी शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले आहे. राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक चेहरे पुण्यात आहेत. पुण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि उज्वल पीढी तयार करण्यासाठी या दिग्गजांनी कठोर मेहनत घेतली आहे. त्यातील काही मंडळींंना 2022 मध्ये पुणेकरांनीच नाही तर महाराष्ट्राने गमावलं आहे. त्यांच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पुण्यातील राजकीय आणि सांस्कृतीक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
'जाणता राजा'कार गमावला...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचं निधन झालं. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली होती. शिवाजी महाराजांवरचा दांडगा अभ्यास होता. मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी पुण्यातील पत्रकार संघात व्याख्यान केलं होतं. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या लढायांचं वर्णन केलं त्यावेळीच बोलताना त्यांना धापा लागत होत्या मात्र तरीही अनेकांना शिवरायांचा इतिहास कळावा यासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले होते. तेच व्याख्यान त्याच्या आयुष्यातलं शेवटचं व्याख्यान ठरलं. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी जन्म झाला होता. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं होतं. 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
सिंधुताई सपकाळ : अनाथांची माय गेली
अनाथ मुलांसाठी आयुष्य खर्ची घालत त्यांना मायेची ऊब देणाऱ्या सिंधुताई सपकाळ (sindhutai sapkal) यांनी 4 जानेवारी 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. दीड हजार अनाथ मुलांचे संगोपन त्या करत होत्या. नुकताच 2021 सालचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे. घार हिंडते आकाशी अन् चित्त तिचं पिल्लांपाशी हे वाक्य त्या आयुष्यभर जगल्या. त्यांच्या जाण्याने शेकडो मुलं पोरकी झाली आहेत.
लढवय्या राजकीय महिला नेतृत्व
पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळकांचं (Mukta tilak) निधन झालं. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या पणतसून म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. 1992 पासून बदलत्या पुण्याच्या त्या साक्षीदार होत्या. नगरसेविका, महापौर आणि आमदार असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला चढता क्रम होता. त्यांच्या जाण्याने पुण्याने महत्वाचं आणि लढवय्य राजकीय महिला नेतृत्व गमावलं.