(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आम्हाला त्रास दिला तर योग्य वेळेला योग्य उत्तर देऊ, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ओमराजे निंबाळकर यांचे आव्हान
बीडमध्ये जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर उस्मानाबादमध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले आहे.
बीड : शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केलं आहे. याच शिव संपर्क अभियानाच बीडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाच्या प्रमुख स्थानी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती होती यावेळी निंबाळकर यांनी बीडमध्ये महाविकास आघाडीचा धर्म न पाळणाऱ्यावर सडकून टीका केली आहे.
बीडमध्ये जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर उस्मानाबाद मध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही - ओमराजे निंबाळकर
महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षाच असून प्रत्येक पक्षाचा आपापला वाटा ठरलेला आहे. उस्मानाबादमध्ये पालकमंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही आघाडी सरकारचा धर्म पाळत आहोत. बीडमध्ये मात्र अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळला जात नसून शिवसैनिकांना त्रास दिला जात आहे याबद्दल मी बीडच्या पालकमंत्र्यांशी चर्चा केली असून हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. बीडमध्ये जर आघाडीचा धर्म पाळला नाही तर उस्मानाबादमध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं निंबाळकर म्हणाले आहेत
आम्हाला त्रास दिला तर योग्य वेळेला योग्य उत्तर देऊ, राष्ट्रवादीच्या नेत्यांना ओमराजे निंबाळकर यांचे आवाहन
बीड जिल्ह्यातून ज्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत त्या ऐकून माझं डोकं फिरलं आहे. आपलं तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे आम्हाला कोणी त्रास देऊ नका शेवटी दोन हात करायची वेळ जर आली तर त्यासाठी देखील शिवसैनिक कमी पडणार नाहीत त्यामुळे आम्हाला त्रास दिला तर योग्य वेळेला योग्य उत्तर देऊ असा इशारा देखील निंबाळकर यांनी बीडमध्ये शिवसेनेला विरोध करणार्या नेत्यांना दिला आहे.
कोणत्या वेळी लोक फोन करतात आणि कशासाठी करतात याचा भन्नाट किस्सा ओम राजे निंबाळकर यांनी सांगितला.
यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याला किती लोक दररोज फोन करतात आणि कुठल्या कुठल्या कामासाठी करतात याचा देखील किस्सा सांगितला. राजकारणात अनेक नेते हे सर्वसामान्यांचा फोन घेत नाहीत मी मात्र फोनवर 24 तास उपलब्ध असतो. मी रात्री किती वाजता फोन उचलतो हे पाहण्यासाठी लोक एकमेकात पैज लावतात त्यामुळे आपण सर्व सामान्ंयासाठी काम केले पाहिजे
जयदत्त क्षीरसागर यांची संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका
या शिवसंपर्क अभियानात बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. मंजिल उनही को मिलती है जिनके सपनोंमे जान होती है, पंखो से कुछ नही होता यारो होसलो से उडान होती है, असे ते म्हणाले. संदीप क्षीरसागर यांच्या पंखामध्ये सध्या सत्ता आहे म्हणून ते उडत आहेत असे ऐरे गैरे नथ्थू खैरे अनेक पाहिले आहेत ते सध्या सत्तेवर बसले आहेत म्हणून त्यांना असं वाटत आहे की सातबारा आता कायमचा त्यांचा झाला आहे
राजकीय कारकीर्द पणाला लावून शिवसेनेत प्रवेश केला हे आमचं चुकलं का? - भरतभूषण क्षीरसागर
या कार्यक्रमाला बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर देखील उपस्थित होते आणि त्यांनीदेखील निंबाळकर यांच्यासमोर बीड नगरपरिषदेला टार्गेट केले जात असल्याची कैफियत निंबाळकर यांच्यासमोर मांडली बीड जिल्ह्यात बीडची एकमेव नगरपालिका शिवसेनेची आहे जिल्ह्यातील इतर नगरपालिकांना त्यांचा निधी मिळतो मात्र आमच्या नगरपालिकेला आलेला निधी हा बांधकाम विभागाकडे वळवला जातो आम्ही पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द पणाला लावून शिवसेनेत प्रवेश केला हे आमचं चुकलं का असा देखील प्रश्न त्यांनी निंबाळकर याना विचारला
धनंजय मुंडेंवर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची टीका
राज्यात सरकार तीन पक्षाचा असला तरी मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. बीडमध्ये मात्र आम्हाला कुठलंच सहकार्य इतर पक्षांकडून मिळत नाही पंचवीस पंधरा चा आणि देखील आम्हाला आतापर्यंत मिळाला नसून पालकमंत्री शिवसेनेला काहीच देत नाहीत आम्हाला या ठिकाणी होणारा त्रास आहे त्याबद्दल निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आमच्यासाठी न्याय मागावा सरकारमध्ये असून देखील बीडच्या शिवसेनेची काय अवस्था आहे हे मुख्यमंत्र्यांसमोर मांडावा अशी विनंती यावेळी बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha