Nashik News : नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांकडून श्रद्धांजली
Nashik News : नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांचे आज पहाटेच्या दरम्यान निधन झाले.
Nashik News : शिक्षण महर्षी तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी (Dr. M S Gosavi) यांचे आज पहाटेच्या दरम्यान निधन (Death) झाले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी देखील सकाळी कुटुंबीयांची भेट श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 23 व्या वर्षी ते नाशिकच्या बीवायके कॉलेजचे (Nashik BYK Collage) प्राचार्य झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मो. स. गोसावी यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून गोसावी सर यांची ओळख होती. डॉ. मो. स. गोसावी यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) उत्तीर्ण केल्यानंतर प्रसासकीय सेवेची निवड न करता शिक्षण क्षेत्राची निवड करून या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविलेला होता. त्यांची वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श शिक्षकाची भूमिका सर्वांना प्रभावित करणारी होती. सर्वात कमी वयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची आजही नोंद कायम आहे. गोसावी यांचा श्रीमद्भगवद्गीतावर नितांत श्रद्धा व प्रचंड असा अभ्यास होता. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबरच ग्रामीण व दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांनी गोखले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. ब त्यांच्या साठी शिक्षणाची कवाडे खुली केली होती. सामाजिक विकासासाठी शिक्षण हे एकमेव साधन आहे, हा विश्वास ठेवून त्यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रचार – प्रसारासाठी आजीवन वाहून घेतले होते. सरांच्या प्राचार्य पदाचा प्रारंभ ज्या बी. वाय. के महाविद्यालयातून झाला. तिथे त्यांचे पार्थिव शरीर सकाळी 10 ते 05 या वेळेपर्यंत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येतील. शिक्षण क्षेत्रात स्वयं प्रकाशित, तेजस्वी ताऱ्या प्रमाणे आलोकित राहून समाजासाठी ही प्रकाश वाटा तयार करणाऱ्या ह्या ज्ञान सूर्याला विनम्र अभिवादन डॉ. मो. स. गोसावी यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
शरद पवारांकडून श्रद्धांजली
शरद पवार यांनी आज सकाळी गोसावी कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. गोसावी मूळचे पैठणचे होते, पण त्यांनी नाशिक कार्य क्षेत्र निवडले होते. महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या तज्ज्ञांची यादी मोठी आहे. त्यात डॉ. मो. स. गोसावी यांच्या नावाशिवाय शैक्षणिक क्षेत्र पूर्ण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. मुंबई, नाशिक आणि पालघर येथे त्यांचे मोठे शैक्षणिक कार्य आहे. त्यांच्या संस्थेतून दर्जेदार शिक्षण देणे, हे त्यांचे काम, त्यात गोसावी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रांत डॉ. गोसावी नावाचा लौकिक राहील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
आज सायंकाळी अंत्यसंस्कार
शिक्षण महर्षी तथा गोखले एज्युकेशन सोसायटीचे (Gokhale Education Society) सचिव डॉ गोसावी यांचे आज पहाटेच्या दरम्यान काळाने निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यांच्या या योगदानामुळे येथे घडलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर काम करत आहेत. तर काही जण उद्योजक आहेत. संस्थेच्या भरभराटीमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले, त्यांच्या पश्चात मुले शैलेश आणि कल्पेश आणि तर कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. त्यांचे अंतिम दर्शन बीवायके कॉलेज येथे सकाळी दहा ते चार या दरम्यान घेता येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज पाच वाजता काढण्यात येणार असून नाशिक शहरातील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.