Nashik Holi Festival : 'होळी रे होळी पुरणाची पोळी', नाशिकमध्ये अंनिसच्या वतीने महत्वाचं आवाहन
Nashik Holi Festival : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महत्वाचे आवाहन केले आहे.
Nashik Holi Festival : होळी (Holi) अवघ्या दोन दिवसांवर आली असून महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. अनेक भागात वेगवगेळ्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन (Maharashtra Andhshradhha) समितीने महत्वाचे आवाहन केले आहे. 'होळी लहान करा, पुरणपोळी दान करा' असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.
राज्यभरात होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो. अनेक वाईट प्रवृत्तींना जाळून होळी साजरी केली जाते. तर आनंद म्हणून घराघरात पुरणपोळीचा (Puranpoli) बेतही आखला जातो. होळी म्हणजे काय? तर मानवी समाजातील एकोपा वाढावा, तणावमुक्ती व्हावी आणि सर्वांना आनंद मिळावा, यासाठी समाजातील सर्व घटक येऊन हा सण साजरा करतात. मात्र हे सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे संतूलन अबाधित राहील, याचे भान ठेवणे, काळजी घेणेही अत्यंत आवश्यक असते. मात्र अनेकदा सण- उत्सव साजरे करताना निसर्गाला हानी पोहचवली जाते. त्यामुळे निसर्गचक्र विस्कळीत होऊन एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण होत असल्याचे अनेक संकेत अनुभवायला मिळतात. यावर महाराष्ट्र अंनिसने महत्वाचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील तीस वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी कृतिशील प्रबोधनाचे काम हाती घेतलेले आहे. विशेषतः शाळा महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांकडून फटाके मुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याबद्दलचे संकल्प पत्र स्वेच्छेने भरून घेतले जातात. त्यामुळे पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात असते. आर्थिक बचत होण्यासोबतच अपघात टळतात. यावर्षीही महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक (Nashik) जिल्हा शाखेच्या वतीने 'होळी करा लहान, पोळी करा दान ' ह्या उपक्रमांतर्गत नाशिक शहरातून पुरणपोळी तसेच खाद्यपदार्थ होळीत न टाकता त्यांचे दान करावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे. होळीच्या ठिकाणी संकलित झालेल्या पुरणपोळ्यांचे गरजू आणि गरीब कुटुंबाना, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमामध्ये वाटप केले जाणार आहे.
अंनिसने काय आवाहन केलंय ?
अंनिसच्या मते, होळीचा सण म्हटलं की आजही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड, गोवऱ्या जाळून साजरा केला जातो. प्रत्यक्ष होळी पेटली असताना, होळीत नारळ, खोबरे आणि पुरणपोळी असे खाद्यपदार्थ टाकून जाळले जातात. होळीनंतर येणारा रंगपंचमी हा सणही पाण्याचा अपव्यय केला जातो. शिवाय रासायनिक रंगामुळे त्वचेला आणि डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोकाही असतो. म्हणून एका गावात, काॅलनीत, गल्लीत एकच लहान, प्रतिकात्मक होळी करावी, होळीसाठी लाकूड, गोवऱ्या जाळू नयेत. पुरणपोळी, नारळ, खोबरे असे खाद्यपदार्थ होळीत टाकण्याऐवजी त्यांचे गरजू व गरीब कुटुंबांमध्ये वाटप करावे. पाणी आणि रासायनिक रंगांऐवजी फक्त वनस्पती रंग वापरून पाण्याशिवाय रंगपंचमी खेळावी, असे आवाहन केले आहे.